नाशिक : राज्य सामायिक परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान या व्यवसाय अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या पीसीएम ग्रुपच्या सीईटी परीक्षार्थी विद्यार्थ्यांची बुधवारी (दि.२२) सकाळच्या सत्रात चांगलीच तारांबळ उडाली, परंतु महासीईटीतर्फे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेपूर्वीच परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याने, बहुतांश विद्यार्थी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचून त्यांनी सीईटी दिली. मात्र, पावसामुळे परीक्षार्थींच्या संख्येत रोजपेक्षा दोन ते तीन टक्के घट झाल्याचे दिसून आली.
नाशिक जिल्ह्यातील एकूण १३ केंद्रांवर सोमवार (दि.२०) पासून सीईटी २०२१ परीक्षा सुरू झाली असून, परीक्षेच्या तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात १,५४८ पैकी १,३४४ विद्यार्थ्यांनी सीईटी दिली, तर २०४ विद्यार्थी या परीक्षेला अनुपस्थित राहिले. त्याचप्रमाणे, दुपारच्या सत्रात १,५४० विद्यार्थ्यांपैकी १,३४९ विद्यार्थ्यांनी सीईटी दिली, तर १९१ विद्यार्थी अनुपस्थित होते. दरम्यान, सीईटी परीक्षेला सोमवारपासून दोन्ही दिवस जवळपास ९० टक्के व त्याहून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविली जात असताना, बुधवारी सकाळच्या सत्रात शहरात मुसळधार पाऊस कोसळल्याने त्याचा परिणाम परीक्षार्थींच्या उपस्थितीवर झाल्याचे दिसून आले. मागीत दोन दिवसांच्या तुलनेत बुधवारी दोन ते तीन टक्के अधिक विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित असल्याची माहिती परीक्षा समन्वयकांकडून देण्यात आली.