अशुद्ध पाणीपुरवठ्याने चांदोरीकर बेजार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 10:37 PM2019-12-15T22:37:00+5:302019-12-16T00:28:57+5:30
निफाड तालुक्यातील मुख्य गाव असलेल्या चांदोरीला गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी गेल्या १० दिवसांपासून गाव विकासाकरिता अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत.
नाशिक : निफाड तालुक्यातील मुख्य गाव असलेल्या चांदोरीला गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी गेल्या १० दिवसांपासून गाव विकासाकरिता अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत.
चांदोरी गावालगत असलेल्या गोदावरी नदीनजीक ग्रामपालिकेची विहीर असून, त्यातून पाणी उपसा करून नवीन बांधलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तेथून नवीन बांधलेल्या पाण्याच्या टाकीतून गावाला पाणीपुरवठा केला जातो. मात्र या जलशुद्धीकरण केंद्रासह परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून, डासांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.
जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात तारकुंपण तसेच विजेची सुविधा नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी वर्गासाठी असलेल्या पडीत घरांचा वापर परिसरात असलेले काही लोक शौचालय म्हणून वापर करत असल्याने दुर्गंधी निर्माण झाली आहे.
पुरेशा प्रमाणात सुरक्षा नसल्याने तरळीरामांचे आश्रयस्थान निर्माण झाले आहे. जलशुद्धीकरण केंद्रानजीक असलेल्या पाणीपुरवठ्याच्या पाइपमधून पाणीगळती होत असल्याने परिसरात चिखल झाला आहे. त्यामुळे डुक्करांचा वावर वाढला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वीच सदर जलकुंभाचे काम केले असून, त्यास संरक्षक कठडे नाही, तसेच जलकुंभावर जाण्यासाठी जिन्याच्या पायºया मोडकळीस आल्या आहेत. ग्रामपालिका प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करून ग्रामस्थांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
डेंग्यू रु ग्णसंख्येत वाढ
चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डेंग्यूचे प्रमाण कमी असल्याचे दावे करत असले तरी गावाच्या विविध भागांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. रेकॉर्डवर नोंदवल्या जात असलेल्या आकडेवारीपेक्षा डेंग्यूचा फैलाव जास्त असल्याचे प्रॅक्टिस करणाºया डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याशिवाय मलेरियासह तापाच्या रुग्णांमध्येही लक्षणीय वाढ दिसू लागली आहे. त्यामुळे गावामध्ये चिंतेचे वातावरण असून, सरकारी दवाखान्यासह खासगी दवाखान्यांमध्येही रुग्णांची रीघ लागली आहे.