वामनदादांच्या नावे औरंगाबाद विद्यापीठात अध्यासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:50 AM2019-05-27T00:50:21+5:302019-05-27T00:50:55+5:30
महाराष्टतील विद्यापीठांमध्ये लोककवी वामनदादा कर्डक यांच्या नावे अध्यासन व्हावे यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. नाशिक- मधील मुक्त विद्यापीठा- नंतर आता औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात वामनदादांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यात आले असून, या अध्यासनाच्या माध्यमातून त्यांच्या समग्र साहित्यावर संशोधन केले जाणार आहे.
नाशिक : महाराष्टतील विद्यापीठांमध्ये लोककवी वामनदादा कर्डक यांच्या नावे अध्यासन व्हावे यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. नाशिक- मधील मुक्त विद्यापीठा- नंतर आता औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात वामनदादांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यात आले असून, या अध्यासनाच्या माध्यमातून त्यांच्या समग्र साहित्यावर संशोधन केले जाणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ लोकगीतांच्या माध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचविण्याचे तसेच समाजामध्ये स्वाभिमान आणि गावागावात चळवळीची ऊर्जा टिकविण्याचे काम वामनदादांनी आपल्या लोकगीतांच्या माध्यमातून केलेले आहे. याशिवाय डॉ. आंबेडकरांनी संविधानात सांगितलेला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी दिलेले योगदान, सुमारे दहा हजार लिहिलेली लोकगीते, गझल, कव्वाली, काव्यसंग्रह आणि आत्मचरित्र क्रमिक पुस्तकांच्या माध्यमातून जनतेसमोर यावे यासाठी गेल्या १४ वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत.
वामनदादांचे साहित्य अभ्यासक्रम आणि संशोधनाच्या पातळीवर नेण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा यासाठी येवला येथील वामनदादा कर्डक प्रतिष्ठान आणि औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहे.
वामनदादांच्या साहित्यावर संशेधन करून समग्र चरित्र उभे केले जाणार आहेच शिवाय त्यांची साहित्य परंपरा जतन करण्याचाही उपक्रम अध्यासनाच्या माध्यमातून राबविला जाईल. शाहिरी जलशाला नवसंजीवनी देण्यासाठीचे प्रशिक्षण, संशोधन अध्यासनाकडून केले जाणार आहे.
- प्रा. युवराज धबाडगे, संचालक, लोककवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्र, औरंगाबाद
वामनदादा कर्डक यांचा सुमारे १० हजार गीतांचा खजिना आहे. अभ्यासक्रमात विषय आला तरच त्यावर अभ्यास होऊ शकले आणि त्यातून वामनदादांचे साहित्य जगासमोर येईल. त्यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्यासाठी राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाकडे पत्रव्यवहार सुरू आहे.
- प्रा. शरद शेजवळ, संस्थापक कार्याध्यक्ष, लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान, नाशिक