मालेगाव : जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेना-भाजप- महायुतीचे उमेदवार दादा भुसे यांनी विजयी चौकार मारला आहे. त्यांना १ लाख २१ हजार २५२ मते मिळाली आहेत, तर कॉँग्रेस-राष्टवादी कॉँग्रेस- महाआघाडीचे उमेदवार डॉ. तुषार शेवाळे यांना ७३ हजार ५६८ मते मिळाली आहेत. भुसेंनी ४७ हजार ६८४ मतांची आघाडी घेऊन डॉ. शेवाळे यांचा पराभव करीत मालेगाव बाह्य मतदारसंघावर आपला करिष्मा पुन्हा एकदा टिकवून ठेवला आहे.गेल्या सोमवारी मालेगाव बाह्य मतदारसंघातील २ लाख ३ हजार ९३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. गुरुवारी येथील वखार महामंडळाच्या गुदामात सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रजित राजपूत यांच्या उपस्थितीत प्रारंभी टपाली मतदान मोजण्यात आले. त्यानंतर मतदान यंत्रावरील मतदानाची मतमोजणी करण्यात आली. २३ फेऱ्यांद्वारे ही मतमोजणी पार पडली. उमेदवारांच्या मागणीनुसार दोन मतदान यंत्राच्या व्हीव्हीपॅडची फेरमतमोजणी करण्यात आली मात्र फारसा बदल झाला नाही. दुपारी २ वाजेपर्यंत अंतिम निकाल जाहीर करण्यात आला होता. महायुतीचे उमेदवार दादा भुसे विजयी झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी मिसाळ यांनी केल्यानंतर भुसे यांनी मतमोजणी केंद्रावर येऊन प्रमाणपत्र घेतले.सकाळपासूनच निकाल ऐकण्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. भुसे समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत विजयोत्सव साजरा केला. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.विजयाची तीन कारणे...1ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या पाठीमागे ग्रामीण व शहरी भागात निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे..2गेल्या पंचवार्षिक निवडणुकीला सुनील गायकवाड यांनी राकॉँकडून भुसेंविरोधात निवडणूक लढविली होती. मात्र या निवडणुकीत सध्याचे भाजपचे नेते गायकवाड यांनी शहर व ग्रामीण भागात मोठे मताधिक्य भुसेंना मिळवून दिले.3भुसेंचा दांडगा जनसंपर्क व गेल्या १५ वर्षांतील विकासकामांच्या जोरावर मते मिळाली.डॉ. शेवाळेंच्या पराभवाचे कारण...बाह्य मतदारसंघात काँग्रेसचे संघटन शक्ती कमी पडली. अद्वय हिरे, प्रसाद हिरे, राजेंद्र भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी जिकिरीची लढत दिली; मात्र शेवटच्या दोन दिवसात नियोजन व यंत्रणा कोलमडून पडले. ग्रामीण व शहरी भागात प्रचार थंडावला होता. मतदानाच्या दिवशी अनेक मतदान केंद्रांवर कार्यकर्त्यांचा अभाव दिसून आला.पराभूत उमेदवार पक्ष मिळालेली मते१ डॉ. तुषार शेवाळे काँग्रेस 73,568२ आनंद लक्ष्मण आढाव बसपा 2568३ अबू गफार मो. इस्माईल अपक्ष 1,199४ अब्दुरशीद मुह इजहार अपक्ष 305५ कमालुद्दीन रियासतअली अपक्ष 488६ काशीनाथ लखा सोनवणे अपक्ष 666७ प्रशांत अशोक जाधव अपक्ष 981८ मच्छिंद्र गोविंद शिर्के अपक्ष 956
दादा भुसे यांचा करिष्मा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 12:49 AM