धर्मादाय संस्थांचा ‘धर्मादायी’ कारभार कागदोपत्री
By admin | Published: February 16, 2017 11:17 PM2017-02-16T23:17:38+5:302017-02-16T23:17:51+5:30
अनियमितता : महिनाभरात १७१५ संस्थांचे दावे निकाली
विजय मोरे नाशिक
जनतेची धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक प्रगतीच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या राज्यातील ७ लाख ४२ हजार ५७० विश्वस्त संस्थांपैकी सुमारे ८० टक्के संस्था या केवळ कागदोपत्री अस्तित्वात असल्याचे समोर आले आहे़ नाशिक विभागातील ५३ हजार विश्वस्त संस्थांपैकी केवळ दहा टक्केच संस्थांचा कारभार सुव्यवस्थितपणे सुरू असून, त्या कायदेशीररीत्या परिपूर्ण, तर उर्वरित ९० टक्के विश्वस्त संस्था केवळ कागदोपत्री आहेत़ राज्याच्या धर्मादाय आयुक्तांनी संस्थांच्या पुनरुज्जीवनासाठी सुरू केलेल्या मोहिमेकडेही संस्थांनी पाठ फिरविली असून, त्यांनी आपला धर्मादाय कारभार सुरूच ठेवल्याचे चित्र आहे़
केवळ कागदोपत्री धर्मादाय तसेच सेवाभावी संस्थांची नोंदणी रद्द करण्याबाबत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा झाली होती़ याबाबत आदेश लागू होण्यापूर्वी संस्थांच्या पुनरुज्जीवनासाठी एक संधी देण्याच्या उद्देशाने राज्याचे धर्मादाय आयुक्त श़ भा़ सावळे यांनी १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत विशेष मोहीम सुरू केली आहे़ या मोहिमेचा लाभ जानेवारी महिन्यात विभागातील एक हजार ७१५ संस्थांनी घेतला असला तरी विभागातील सेवाभावी संस्थांची संख्या लक्षात घेता ही संस्था अत्यल्प असल्याचे दिसून येते़
‘विश्वासातून विकास’ हे ब्रीद, तर शैक्षणिक प्रचार, रुग्णसेवा व सामाजिक एकता ही उद्दिष्ट्ये समोर ठेवून धर्मादाय संस्थांचे कार्य अपेक्षित आहे़ नाशिक विभागातील धर्मादाय संस्थांचा विचार करता सुमारे ९० टक्के धर्मादाय संस्थांनी गत अनेक वर्षांपासून लेखापरीक्षण, बदल अर्ज वा कायदेशीर बाबींची पूर्तता केलेली नसून त्या अनियमित व बेकायदेशीर ठरणार आहेत़ यापैकी अनेक संस्थांनी तर मोठ्या प्रमाणात शासकीय योजना राबवूनही धर्मादाय आयुक्तांकडे अहवालच सादर केलेला नाही़ आजमितीस नोंदणी केलेल्या संस्थांमध्ये अनियमित संस्थांची संख्या निम्म्याहून अधिक आहे़