नाशिक : विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने मते खाल्ल्यामुळे आघाडीच्या काही जागांवर फटका बसला असून, वंचितने आघाडीबरोबर यावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले ते जर आघाडीसोबत राहिले असते तर भारतीय जनता पक्ष सत्तेपासून दूर गेला असता असा दावा राष्टÑवादीचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी केला आहे.कॉँग्रेस आघाडीच्या विजयी व पराभूत उमेदवारांचा शुक्रवारी राष्टÑवादी भवनात भुजबळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले, राज्यातील काही जागांवर वंचित बहुजन आघाडीमुळे कॉँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना फटका बसला आहे. पंकज भुजबळ यांचा नांदगाव मतदारसंघात त्यामुळे पराभव झाला असून, विजयासाठी जितकी मते हवी होती ती सारी मते वंचितच्या उमेदवाराने घेतल्यामुळे पंकज भुजबळ यांचा पराभव झाला. वंचितच्या उमेदवारांमुळे मतांचे विभाजन झाले ते होऊ नये यासाठी निवडणुकीपूर्वीच कॉँग्रेस आघाडीने वंचितबरोबर चर्चा सुरू केली होती. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलत होते व बऱ्यापैकी जागाही देऊ केल्या होत्या; परंतु वंचितच्या वागण्या, बोलण्यात सातत्य नव्हते. ते प्रत्येक वेळी वेगळे काही तरी बोलत होते.आघाडीत सामील व्हायचे नव्हते असेच त्यांचे वर्तन होते; मात्र ते जर आघाडीत सामील झाले असते तर भाजप सत्तेपासून बरीच दूर गेली असती.शिवसेनेने भाजपसमोर फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठेवला असून, अशा प्रसंगी सेना व कॉँग्रेस आघाडी एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन करू शकते काय या प्रश्नावर भुजबळ यांनी ‘राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही’ असे सूचक विधान केले. एक्झिट पोल व ज्योतिषीदेखील आता खरे सांगत नाही असा अनुभव असताना राजकारणातदेखील काहीही होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
‘वंचित’मुळे आघाडीच्या काही जागांना फटका छगन भुजबळ : तर भाजप सत्तेपासून दूर गेली असती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 1:29 AM