नाशिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाजनादेश यात्रेला भाजपाध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली होती. या महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत या यात्रेचा समारोप होत आहे. या समारोप कार्यक्रमाला राज्यातील भाजपाचे दिग्गज नेते आणि मंत्री उपस्थित होते. याच व्यासापीठावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले उदयनराजे भोसेले हेही हजर होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना, उदयनराजेंचा विशेष उल्लेख केला. ''ज्यांनी आपल्या पदाचा त्याग करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व स्विकारून भाजपात प्रवेश केला ते छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले'' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. फडणवीस यांनी उदयनराजेंचं नाव घेताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टाळ्या वाजवून दाद दिली. छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य संस्थापक असे संबोधत मुख्यमंत्र्यांनी मोदींसमोर पुन्हा एकदा हिंदुत्वाला प्रमोट केलं आहे. तसेच, यंदाच्या निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचीही साथ आपल्याला मिळाल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.
उदयनराजे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत केलं. महाराजांच्या मावळ्यांची पगडी परिधान करुन मोदींचा सत्कार केला. त्यावेळी, मोदींनीही उदयनराजेंचा हात आपल्या हाताने उंचावत, उदयनराजेंचं भाजपात स्वागत केलं. उदयनराजेंना व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ बसविण्यात आले होते. उदयनराजेंना सन्मान देत, भाजपाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आशार्वीद आमच्यासोबत असल्याचे म्हटले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही उदयनराजेंचा उल्लेख करताना, खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुबीयांनी माझ्या डोक्यावर छत्र ठेवल्याचं मोदींनी म्हटलं.