नाशिक : राहत्या घरात वयोवृध्द वडीलांचा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर मनोरूग्ण भाऊ-बहिणीने परिसरातील कोणालाही याबाबत माहिती न देता स्वत:ला घरात कोंडून घेत मयत पित्याच्या मृतदेहासोबत चार दिवस काढल्याचे शनिवारी (दि.१६) उघडकीस आले. परिसरात दुर्गंधी सुटल्याने नागरिकांचे लक्ष वेधले गेले तेव्हा रहिवाशांनी पंचवटी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, शनिचौक परिसरात पुराणकि वाडा आहे. या वाड्यात अरु ण विष्णुपंत पुराणकि हे कुटूंबियांसोबत राहत होते. त्यांचा मुलगा व मुलगी दोघेही मनोरुग्ण असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. दोघेही घरात स्वत:ला कोंडून घेत असे. अनेक दिवस ते घराबाहेर पडल्याचे कोणालाही नजरेस पडत नव्हते. त्यामुळे परिसरातील नागरिकांशी त्यांचा जवळपास संपर्क पुर्णपणे तुटलेला होता.
शनिवारी संध्याकाळी सात वाजेपासून शनिचौक परिसरात वेगळ्याच प्रकारची काही तरी कुजून दुर्गंधी सुटत असल्याचे नागरिकांना जाणवले. सुरूवातीला रहिवाशांनी मोकाट कुत्रे, किंवा मांजर मृत झाली असावी त्यामुळे दुर्गंधी येत असल्याचे गृहित धरून दुर्लक्ष केले; मात्र दुर्गंधीचे प्रमाण अधिक असल्याने काही नागरिकांचा संशय बळावला. त्यांनी चौकातील पुराणिक वाड्याजवळ जाऊन खात्री करण्याचा प्रयत्न केला असता दुर्गंधी वाड्यामधून येत असल्याचे लक्षात आले. दरम्यान, परिसरातील रहिवाशांनी तत्काळ ही माहिती पोलिसांना दिली. अवघ्या काही मिनिटांमध्ये पंचवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी दरवाजा वाजवून उघडण्यास सांगितले; मात्र दरवाजा आतून कोणीही उघडण्यास तयार नव्हते.
धक्कादायक घटना; नागरिक आश्चर्यचकित !पंचवटी परिसरातील शनि चौकात झालेल्या या धक्कादायक घटनेची परिसरात चर्चा रंगली होती. मुलामुलीने मयत पित्याच्या मृतदेहासोबत चक्क चार दिवस काढल्याचे समजल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. इतक्या मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली असतानाही या मुलामुलीने चार दिवस पित्याच्या मृतदेहाजवळ बसून कसे काढले असतील? असा प्रश्न पंचवटीकरांनाही पडला आहे. कारण जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा संपुर्ण भागात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरल्याने अनेकांना नाकातोंडाला रूमाल लावावा लागला होता. तसेच काहींनी घराच्या खिडक्याही बंद केल्या होत्या.मृतदेह कुजलेल्या अवस्थेतवाड्याचा दरवाजा उघडत नसल्यामुळे पोलिसांनी अखेर दरवाजाला जोरजोरात धक्के दिले आणि दरवाजा अखेर उघडला. नाकातोंडाला रूमाल बांधून परफ्यूमचा मारा करत पोलिसांनी घरात प्रवेश केला असता कुजलेल्या मृतदेहाजवळ दोघे भाऊ-बहिण रडत बसल्याचे त्यांना आढळले. पोलिसांनी तत्काळ दोघांना घराबाहेर आणले व मृतदेहाचा पंचनामा करत शवविच्छेदनासाठी जिल्हा रु ग्णालयात हलविले. पुराणिक यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत