सिडकोला मंगळसुत्र अन् मुंबईनाक्यावर कारफोडून लॅपटॉप लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 02:10 PM2019-11-28T14:10:42+5:302019-11-28T14:13:26+5:30
शहर व परिसरात दुचाकी, मोबाईल चोरीचा सिलसिला चोरट्यांनी सुरूच ठेवला आहे. पोलिसांकडून सातत्याने कारवाई व पेट्रोलिंग केली जात असतानाही चोरट्यांवर अद्यापही वचक निर्माण झालेला नाही.
नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीच्या घटना सातत्याने सुरूच आहेत. बडदेनगरच्या रस्त्याने पायी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र असलेली पोत हिसकावून दुचाकीवरून आलेले चोरटे फरार झाल्याची घटना मंगळवारी (दि.२६) घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनिता संजय देसले (४७, रा. लेखानगर, सिडको) या बडदेनगर रस्त्याने पायी जात होत्या. यावेळी येथील एका रुग्णालयासमोर त्यांच्या समोरील बाजूने दुचाकीवरून आलेल्या दोघा इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या काळ्या रंगाचे जॅकेट घातलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे ७१ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात सोनसाखळी चोरांविरुद्ध जबरी चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक शिंदे करीत आहेत.
मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीतील एका हॉटलेच्या वाहनतळात उभ्या केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप लांबविल्याची घटना मंगळवारी (दि.२६) सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रफुल्ल अरूण पाटील (३८,रा. गणेशदर्शन सोसा. पाथर्डीफाटा) यांनी मुंबईनाका पोलीसांकडे फिर्याद दिली आहे. पाटील हे मुंबईनाक्याजवळील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले असता त्यांची स्वीफ्ट मोटार (एम.एच.१९ बीजे ५८३०) त्यांनी वाहनतळात उभी केली. चोरट्यांनी दरवाजाची काच फोडून ३० हजार रूपये किंमतीचा लिनोव्हो कंपनीचा लॅपटॉप लांबविला.
दोन दुचाकी चोरट्यांनी केल्या गायब
नाशिक शहर व परिसरात दुचाकी, मोबाईल चोरीचा सिलसिला चोरट्यांनी सुरूच ठेवला आहे. पोलिसांकडून सातत्याने कारवाई व पेट्रोलिंग केली जात असतानाही चोरट्यांवर अद्यापही वचक निर्माण झालेला नाही. अज्ञाच चोरट्यांनी गंगापूररोड, बोरगड येथून दोन दुचाकी गायब केल्या. तसेच इंदिरानगरला पुन्हा एका युवकाच्या हातातील मोबाइल बळजबरीने हिसकावल्याचा प्रकार घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील रावसाहेब थोरात सभागृहाशेजारी असलेल्या वाहनतळात हेमंत अनिल बोकील (३०, रा. इंदिरानगर) यांनी त्यांची बजाज दुचाकी (एम.एच.१५ बीएल १२५२) अज्ञात चोरट्यांनी लबाडीने चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हवालदार धारणकर करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील बोरगड येथील सप्ततारा सोसायटीत राहणारे काशिनाथ गोसावी (४२) यांच्या अपार्टमेंटच्या वाहनतळातून त्यांच्या मालकीची होंडा ड्रीम युगा दुचाकी (एम.एच.१५ ई.के ८००६) अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी त्यांनी म्हसरूळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला.