सराईत गुन्हेगारांमध्ये वचक; शहरातील ८ गुन्हेगार तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 04:52 PM2020-06-25T16:52:23+5:302020-06-25T16:52:47+5:30
शहरात शांतता राहावी, सण उत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी शहर पोलीस सराइत गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे गुन्हेगार, त्यांचे समर्थकांना सामाजिक भान ठेवून त्यांच्या वर्तवणूकीत सुधारणा करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
नाशिक : शहरातील उपनगर, नाशिकरोड आणि अंबड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारी टोळी तयार करुन गंभीर गुन्हे करणाऱ्या ८ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण होईल व शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक गुन्हे दाखल असलेल्या मयुर चमन बेद (३१) याच्यासह संजय उर्फ मॉडेल चमन बेद (३३) व रोहित उर्फ माथ्या उर्फ बंटी गोविंद महाले उर्फ डिंगम (२३, रा. फर्नांडिसवाडी, उपनगर) या तिघांना तडीपार केले आहे. तसेच नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवाज उर्फ बाबा बब्बु शेख याच्या टोळीतील अक्षय बाळू धुमाळ (२३, रा. अरिंगळे मळा, नाशिकरोड), मोसिन युसुफ पठाण (२६, रा. सादिक नगर, वडाळागाव) आणि शुभम ज्ञानेश्वर सुर्यवंशी (२०, रा. देवळालीगाव) या तिघांनाही तडीपार केले आहे. तर अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोबीन तन्वीर कादरी (रा. उपेंद्रनगर) या टोळीप्रमुखासह त्याचा साथीदार गौरव उमेश पाटील (रा. साईबाबानगर, सिडको) या दोघांनाही शहर व जिल्ह्यातून तडीपार केले आहे. शहरात शांतता राहावी, सण उत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी शहर पोलीस सराइत गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे गुन्हेगार, त्यांचे समर्थकांना सामाजिक भान ठेवून त्यांच्या वर्तवणूकीत सुधारणा करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच नागरिकांनीही गुन्हेगारांविषयी माहिती दिल्यास गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येईल व तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवण्याचे आश्वासन पोलीस उपआयुक्त विजय खरात यांनी दिले आहे.