मालेगावकरांना शहरबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 10:41 PM2020-04-30T22:41:16+5:302020-04-30T23:23:18+5:30

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांचे प्रमाण अत्यंत नियंत्रित असले तरी मालेगावमधून स्थलांतरितांमुळे नाशिक शहरात धोका वाढू नये यासाठी महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे.

 City closure to Malegaon residents | मालेगावकरांना शहरबंदी

मालेगावकरांना शहरबंदी

Next

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांचे प्रमाण अत्यंत नियंत्रित असले तरी मालेगावमधून स्थलांतरितांमुळे नाशिक शहरात धोका वाढू नये यासाठी महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. महापौर सतीश कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने पोलिसांना तातडीने पत्र पाठविले असून, मालेगावकडून येणारी मुंबई-आग्रा रोडवरील सीमा सील करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार आडगाव येथे सीमा सील करण्यात आली आहे, तर अन्य दोन ठिकाणी महापालिकेची पथके तपासणी करीत आहेत.
गेल्या महिन्यात कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर सुरुवातील निफाड पाठोपाठ नाशिक शहरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. मात्र, त्यानंतर महापालिकेने अगोदरच केलेले नियोजन अत्यंत कडकपणे अमलात आणले. बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची तपासणी, बाधितांच्या घराच्या परिसरातील नागरिकांची तपासणी पाचशे मीटर ते तीन किलोमीटर एरिया सील करणे अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या. त्यामुळे शहरात आता दहा बाधित रुग्ण आढळले असले तरी मूळ शहरातील रुग्ण तीनच आहेत. बाकी अनेक जण स्थलांतरित किंवा अन्य शहरांतून आल्यानंतर त्यांना कोरोना झाल्याचे आढळले आहे. गेल्या दहा दिवसांत तर मूळ नाशिक शहरात एकही रुग्ण आढळला नसताना बाहेरून आलेल्यांमुळेच नाशिक शहराची डोकेदुखी वाढत आहे. मालेगाव हे शहरापासून जवळ असल्याने उपचार आणि आश्रयासाठी अनेक मार्गाने नागरिक शहरात दाखल होऊ लागल्याची चर्चा आहे. महापौर सतीश कुलकर्णी यांनी यांसदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र देतानाच पोलीस दलाला सीमा सील करताना शिथिलता बाळगली जात असेल तर शहर आणि जिल्ह्याच्या सीमेवर सीआरपीएफ जवान तैनात करण्याची मागणीच केली आहे. त्याच अनुषंगाने महापालिकेने पोलीस आयुक्तालयाला पत्र देऊन मालेगावकडून येणारा मुंबई-आग्रा महामार्ग सील करण्याची मागणीच केली आहे. त्यानुसार आडगाव येथे पोलिसांनी सीमा सील केली आहे. याशिवाय औरंगाबाद आणि दिंडोरी मार्गावरून येणा-या स्थलांतरितांवर करडी नजर ठेवली जात आहे. महापालिकेच्या वतीनेदेखील शहराच्या हद्दीलगत पाहणी केली जात आहे.

Web Title:  City closure to Malegaon residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक