लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 12:25 AM2019-10-28T00:25:37+5:302019-10-28T00:25:59+5:30
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दिवाळी सणातील लक्ष्मीपूजनाचा सोहळा रविवारी (दि. २७) अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा झाला.
नाशिक : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दिवाळी सणातील लक्ष्मीपूजनाचा सोहळा रविवारी (दि. २७) अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा झाला. सकाळी नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर अभ्यंग स्नान करून सायंकाळी अश्विन वद्य अमावस्येच्या मुहूर्तावर घरोघरी नागरिकांनी सुख-समृद्धीची मनोकामना करीत लक्ष्मीचे मनोभावे पूजन केले. छोटे-मोठे व्यावसायिक व व्यापारी बांधवांनी दुकानामध्ये पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन केले. यानिमित्त अबालवृद्धांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत भेटवस्तू दिल्या.
यंदा नरक चतुर्दश्ी आणि लक्ष्मीपूजन हे दिवाळी पर्वातील दोन सण एकाच दिवशी आल्याने रविवारी सकाळी पहाटे घरोघरी अश्विन शुद्ध चतुर्दशी या दिवश्ी अंगाला तेल-उटणे लावून अभ्यंग स्नान केले.
बाजारपेठ गजबजली
लक्ष्मीपूजन सणानिमित्त रविवारी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत फुले-फळे, पूजेचे साहित्य, कपडे व नवीन वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यामुळे मेनरोड, शालिमार, गंगापूररोड, कॉलेजरोड आदी भागातील बाजारपेठ दिवसभर गजबजली होती. आठवडाभर सुरू असलेल्या रिमझिम पावसाने रविवारी उघडीप दिल्याने नागरिकांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून. परंतु पूजेसाठी लागणाऱ्या झेंडूची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने फुलांचे दर घसरले. दसरा सणाला सुमारे १०० ते १२० रुपये किलो दराने मिळणारे फुले रविवारी ४० ते ५० रुपये किलोने विकली जात होती. सायंकाळी तर फुलांचे दर आणखी कोसळले. ४० ते ५० रुपये कॅरेट या दराने फुले मिळत होती.
पाडवा, वहीपूजनाचा मुहूर्त
सोमवारी (दि. २८) अमावस्येला पूजनासाठी सकाळी ६.३६ ते ८.०१ वाजेपर्यंत अमृत मुहूर्त असून, त्यानंतर सकाळी ९.२७ ते १०.५३ पर्यंत लाभ मुहूर्तदेखील आहे. त्याचप्रमाणे व्यापारीबांधवांकरिता वही पूजनासाठी सकाळी ९.२७ ते १०.५३ पर्यंत शुभ मुहूर्त आहे.
मनोभावे लक्ष्मीपूजन
लक्ष्मीपूजनासाठी दुपारी १.४५ ते ३.११ वाजेपर्यंत शुभ मुहूर्त होता तर सायंकाळी ६.०२ ते ७.३७ पर्यंत शुभ मुहूर्त आणि रात्री ७.३७ ते ते ९.११ वाजेपर्यंत अमृत मुहूर्तावर लक्ष्मीपूजन सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदात पारंपरिक पद्धतीने साजरा झाला.
चौरंगावर लक्ष्मी, विष्णू, कुबेर आदी देवदेवतांच्या मूर्ती व प्रतिमा ठेवून मनोभावे पूजन करण्यात आले. तसेच दागिने, पैसे (कोºया नोटा) धनधान्य यांचेही पूजन करण्यात आले. यावेळी लक्ष्मी व अन्य देवदेवतांना मिष्ठान्न, फराळाचे पदार्थ, लाह्या, बत्तासे, धने, गुळ आदिंचा नैवेद्य दाखवून आरती म्हणण्यात आली. त्याचप्रमाणे घरात, नोकरी-व्यवसायात सुखसमृद्धी लाभू दे अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली. दरम्यान, लक्ष्मीपूजनानंतर ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.