शहराला बेमोसमी पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:14 AM2021-04-15T04:14:25+5:302021-04-15T04:14:25+5:30
-------- नाशिक : शहर व परिसरामध्ये बुधवारी (दि.१४) दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानकपणे ढगाळ हवामान तयार झाले. सोसाट्याचा वारा ...
--------
नाशिक : शहर व परिसरामध्ये बुधवारी (दि.१४) दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानकपणे ढगाळ हवामान तयार झाले. सोसाट्याचा वारा अन मेघगर्जनेसह बेमोसमी पावसाने शहराच्या विविध भागांमध्ये हजेरी लावली. कोठे टपोऱ्या थेंबांच्या मध्यम तर कुठे जोरदार सरी कोसळल्या. इंदिरानगर व पाथर्डी अंबड या भागामध्ये पावसाचा जोर अधिक राहिला. पेठ रोडवरील हवामान केंद्राने २.४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद केली आहे.
नाशिक शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून उकाडा चांगलाच वाढलेला जाणवत होता. तसेच वाऱ्याचा द्रोनिय प्रभाव व बदललेली दिशा यामुळे हवामान खात्याकडून राज्यातील विदर्भासह मध्य-उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसण्याचा इशारा देण्यात आला होता. बुधवारी दुपारी साडेतीन वाजेपासूनच शहराचा उपनगर विभागांमध्ये ढग दाटून येण्यास सुरुवात झाली. दुपारी चार वाजेच्या दरम्यान शहरातील मध्यवर्ती परिसरासह पंचवटी, नाशिकरोड, द्वारका, वडाळागाव, इंदिरानगर, पाथर्डी, सिडको, अंबड सातपूर अशा सर्वच उपनगरांमध्ये ढगाळ हवामान अधिक वाढले आणि सोसाट्याचा वारा सुटल्याने पावसाच्या सरी नाही सुरुवात झाली ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह बेमोसमी पावसाच्या सरी या भागांमध्ये चांगल्याच कोसळल्या. सुमारे तासभर पावसाचा जोर दिसून आला. इंदिरानगर, गोविंदनगर पाथर्डी भागात पावसाचे प्रमाण जास्त होते. वडाळा गावातदेखील सुमारे वीस मिनिटे पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी साडेपाच वाजेपासून वातावरण पुन्हा निवळले होते आणि नाशिककरांना सूर्यदर्शन झाले.
वादळी वारा फारसा टिकून राहिल्यामुळे शहरात कोठेही वृक्ष कोसळण्याची घटना घडली नाही. पावसाने लावलेल्या हजेरीमुळे वातावरणातील उष्मा कमी होण्यास मदत झाली असून, सायंकाळपासून थंड वारा सुटल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे नाशिककरांना रात्री वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळाला.
दरम्यान, सोसाट्याचा वारा सुटताच द्वारका काठे गल्ली वडाळागाव, पखालरोड, वडाळारोड, टाकळीरोड, शंकरनगर आदी भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या भागात वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.