लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पाण्यापासून होणारे साथीचे विकार दूर ठेवण्यासाठी पाणी गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ३०५१ जलकुंभांची स्वच्छता करण्यात आली असून, ३० जूनपर्यंत उर्वरित तालुक्यांमधील जलकुंभांची स्वच्छता करण्यात येणार आहे. जिल्ह्यात मागील वर्षापासून जलकुंभ स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून, पावसाळ्यापूर्वी सर्व जलकुंभांची स्वच्छता करण्यात येत असल्यामुळे निश्चितच जलजन्य आजारांना प्रतिबंध बसणार असून, उर्वरित तालुक्यांनीही नियोजनाप्रमाणे अभियान राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे व जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे हा पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे ग्रामपंचायतीचे मूलभूत कर्तव्य आहे. यासाठी पाणी व स्वच्छता विभागातील पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या, हातपंप शुद्धीकरण, टी.सी.एल. साठवणूक व टी.सी.एल. नमुना तपासणी, साथीचे आजार इत्यादी विषय अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या सूचनेवरून गेल्या वर्षापासून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, अंगणवाडी व शाळेमधील पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या व हातपंप शुद्धीकरण अभियान राबविण्यात येत आहे. आतापर्यंत बागलाण, सिन्नर, दिंडोरी, निफाड, पेठ, त्र्यंबकेश्वर व देवळा तालुक्यात सदरचे अभियान पूर्ण झाले आहे. या तालुक्यांमध्ये आतापर्यंत ३०५१ शाळा व अंगणवाड्यांमधील जलकुंभांची स्वच्छता करण्यात आली असून, ग्रामपंचायतीच्या ११०७ जलकुंभांची स्वच्छता करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १६१६ हातपंपांचे शुद्धीकरण करण्यात आले असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी दिली. ३० जूनपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात सदरचे अभियान पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामपंचायत, अंगणवाडी व शाळेत वापरात येणाऱ्या पाण्याच्या टाक्या पूर्णपणे रिकाम्या करून त्यातील स्वच्छता करणे व ज्या स्रोताचे पाणी पिण्यास वापरले जाते त्याचे क्लोरीनेशन आरोग्य सेवक, आरोग्य सहायक व जलसुरक्षक यांच्यामार्फत करण्यात येत आहे. पावसाळ्यात पुरेशा प्रमाणात टी.सी.एल. उपलब्ध राहील यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले आहे.