शहरात ढगाळ वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:12 AM2021-06-04T04:12:15+5:302021-06-04T04:12:15+5:30
नाशिक : गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी शहरासह जिल्हाभरात ढगाळ हवामान निर्माण झाल्यामुळे शेतकरी खरिपाच्या तयारीला लागला आहे. ...
नाशिक : गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी शहरासह जिल्हाभरात ढगाळ हवामान निर्माण झाल्यामुळे शेतकरी खरिपाच्या तयारीला लागला आहे. शेतात मशागतीची कामे सुरू झाली असून भात, सोयाबीन पेरणीलाही काही भागात सुरुवात झाली आहे.
आंब्याला मागणी वाढली
नाशिक : शहरातील बाजारपेठेत आंब्याला मागणी वाढली आहे. वर्षभराचे लोणचे करण्यासाठी त्याचप्रमाणे जवळच्या आप्तस्वकियांना आमरसाचा पाहुणचार करण्यासाठी ग्राहकांकडून आंब्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याचे विक्रेते सांगतात.
-
रस्त्यांवर वर्दळ वाढली
नाशिक : शहरात कडक निर्बंधांतून शिथिलता मिळताच विविध रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ वाढल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे भद्रकालीतील दूधबाजार, मुंबई नाका, एमजी रोड परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसून येत आहे.
--
दुभाजकांवर काटेरी झुडपे
नाशिक : इंदिरानगर- पाथर्डी रस्त्यावरील दुभाजकाची दुरवस्था झाली आहेे. दुभाजकावरील शोभेच्या फुलांची रोपे वाळून गेली असून त्या जागेवर काटेरी झुडपे व गवत उगवले आहे. हे गवत काढून फुलांची पुनर्लागवड करण्याची गरज व्यक्त होत आहे.
---
रस्त्यांवरील बॅरिकेट्स हटविण्याची मागणी
नाशिक : शहरातील इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड भागांतील रस्त्यांवर तसेच रस्त्यांच्या कडेला कोरोना काळात गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी उभे केलेले बॅरिकेट्स बेवारसपणे पडून आहेत. आता शहरातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल होत असताना हे बॅरिकेट्स तसेच पडून असल्याने बेवारस पडलेले बॅरिकेट्स हटविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
--
बेशिस्त दुचाकीस्वार पुन्हा जोरात
नाशिक : जिल्ह्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन सोमवारी संपुष्टात येताच रस्त्यावर सुसाट वेगाने धावणाऱ्या बेशिस्त दुचाकीस्वारांची बेफिकिरी दिसून आली. शहरातील वडाळा, पाथर्डजी रोड, रविशंकर मार्ग, कॉलेज रोड, मुंबई नाका, द्वारका तसेच नाशिकरोड भागात अनेक दुचाकीस्वार रस्त्यावर स्टंटबाजी करीत धिंगाणा घालताना दिसून येत आहेत. अशा बेशिस्त दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
--
आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा
नाशिक : शहरातील रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. मागील काही महिन्यांपासून रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला होता. यामुळे अनेकांना साप्ताहिक सुटी किंवा रजा घेणेही कठीण झाले होते. मात्र, आता रुग्णसंख्या कमी होत असताना नवीन रुग्णांचे प्रमाणही कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.
--
हॉटेल चालकांसमोर विविध अडचणी
नाशिक : मागील वर्षापासून अडचणीत सापडलेल्या हॉटेल उद्योगाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही व्यावसायिकांनी तर हॉटेल बंद करणे पसंत केले आहे. हॉटेलचे मेन्टेनन्स आणि स्टाफ सांभाळणे अनेकांना कठीण झाले आहे. लॉकडाऊन उघडल्यानंतरही ग्राहक येतात की नाही, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात असल्याने सध्यातरी पर्यायी व्यवसाय करण्याचा विचार अनेक जण करीत आहेत.
--