इथेनॉलसोबतच कादवा करणार सीएनजी निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:31 AM2021-09-02T04:31:19+5:302021-09-02T04:31:19+5:30
*कादवाची 50 वी सुवर्णमहोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन संपन्न* दिंडोरी : साखर उद्योग मोठ्या अडचणीतून मार्गक्रमण करत असताना कादवाची ...
*कादवाची 50 वी सुवर्णमहोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन संपन्न*
दिंडोरी : साखर उद्योग मोठ्या अडचणीतून मार्गक्रमण करत असताना कादवाची गाळप क्षमता दुप्पट केली असून, केवळ साखर निर्मिती करून कारखाने चालणे शक्य नसल्याने इथेनॉल प्रकल्पाचे काम सुरू केले आहे, तसेच सीएनजी प्रकल्पही सुरू करणार असल्याचे प्रतिपादन कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.
कादवा सहकारी साखर कारखान्याची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने चेअरमन शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना श्रीराम शेटे यांनी सभा ही ऑनलाइन घ्यावी, हा शासनाचा आदेश असल्याने सभा ऑनलाइन घेण्यात येत असल्याचे सांगत कादवाची वाटचाल विशद केली. कादवाने गाळप कार्यक्षमता दुप्पट केली असून, कमी दिवसांत जास्त गाळप होत उत्पादन खर्च कमी होत आहे. ऊसतोड वेळेत व्हावी यासाठी यावर्षी गावपातळीवर शेतकऱ्यांची समिती बनवत योग्य नियोजन करून वेळेत ऊसतोड केली जाईल, असे सांगितले. केवळ साखर निर्मिती करून कारखाने चालणे शक्य होणार नसल्याने कारखान्याने इथेनॉल प्रकल्प हाती घेतला असून, त्यास सभासद, ऊस उत्पादक प्रतिसाद देत असून ठेवी ठेवत आहेत.
केंद्र सरकारने इथेनॉलसोबतच सीएनजी प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना करत काही सवलती देऊ केल्या असून, सदर सीएनजी निर्मितीसाठी आवश्यक ७५ टक्के कच्चा माल उपलब्ध असून, नाशवंत भाजीपाला तसेच हत्तीगवताचा वापर करत सदर गॅस निर्मिती प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याचे शेटे यांनी सांगितले.
यावेळी सभासद आमदार नरहरी झिरवाळ यांनी कारखान्याच्या विविध प्रकल्पांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले. प्रकाश शिंदे यांनी काही खर्च दुप्पट झाले, ठेवी गोळा करणे व शेअर्स रक्कम वाढ याबाबत प्रश्न विचारले. सचिन बर्डे यांनी गणदेवी कारखान्याप्रमाणे ऊस भाव धोरण राबविणार का, असा सवाल केला. शिवाजी शिंदे यांनी चांदवड तालुक्यात पाऊस कमी पडत असल्याने ऊसपुरवठा कमी होत असला तरी सीएनजी प्रकल्प करावा त्यासाठी आवश्यक गवतपुरवठा जास्तीत जास्त करू, असे सांगितले. प्रकाश पिंगळ, दिलीप शिंदे, शिवाजी शिंदे, मधुकर टोपे, विनायक काळे, संजय जाधव, संजय शिर्के, लक्षण देशमुख, प्रवीण संधान, आनंदा उगले आदींनी चर्चेत भाग घेतला. विलास निरगुडे यांनी कर्ज तपशील व मयूर जाधव यांनी ऊस उत्पादन वाढीबाबत लेखी प्रश्न विचारले. व्हाइस चेअरमन उत्तम भालेराव यांनी स्वागत केले, तर संचालक शहाजी सोमवंशी यांनी आभार मानले.
चौकट...
...तर निवडणूक लढणार नाही
विरोधक राजकीय द्वेषापोटी, कारखान्याची प्रगती बघवत नसल्याने आपल्यावर आरोप करत असल्याचे सांगत श्रीराम शेटे यांनी कादवाला बँकेने कर्जपुरवठा बंद केला होता, तो सुरू केला, हा गुन्हा आहे का? १२५० मे. टन गाळप क्षमता आज २५०० मे. टन करत २६००, २७०० मे. टन क्षमतेने गाळप करत आहे हा गुन्हा आहे का? बायोप्रॉडक्ट नसताना उत्तर महाराष्ट्रात उसाला सर्वाधिक भाव दिला हा गुन्हा आहे का? महाराष्ट्रातील नावाजलेल्या कारखान्यांच्या पंगतीत कादवाचे स्थान नेले हा गुन्हा आहे का? काळाची पावले ओळखत इथेनॉल, सीएनजी प्रकल्प हाती घेतले, हा गुन्हा आहे का? असे सांगत जर सुज्ञ सभासदांनी थांबा, असे सांगितले, तर मी निवडणूकही लढवणार नाही; परंतु संस्थेच्या हितासाठी कुणीही अपप्रचार करत कादवाच्या प्रगतीला खीळ घालू नये, असे चेअरमन श्रीराम शेटे यांनी सांगितले. (जोड आहे.)