रंगमंदिरे पुन्हा बहरण्याचा रंगकर्मींना विश्वास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:17 AM2021-09-26T04:17:09+5:302021-09-26T04:17:09+5:30
नाशिक : शासनाने २२ ऑक्टोबरपासून रंगभूमी सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्याने रंगकर्मी आणि सिनेप्रेमींनादेखील काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच ...
नाशिक : शासनाने २२ ऑक्टोबरपासून रंगभूमी सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्याने रंगकर्मी आणि सिनेप्रेमींनादेखील काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच पूर्वीप्रमाणेच रंगभूमी पुन्हा बहरेल, असा विश्वासदेखील व्यक्त केला आहे. हा निर्णय घेतानाच राज्य शासनाने निदान यापुढे काही काळ रंगभूमीच्या भाड्याच्या दरांमध्ये कपात करून दिलासा देण्याची मागणी केली आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षापासून बंद असलेली नाट्यगृहे काही अटी व शर्थींवर सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हा मनोरंजन क्षेत्राला बसला आहे. यामुळे कलाकारांबरोबरच या क्षेत्रातील इतर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याने राज्य सरकारने नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेबरोबरच मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी केली होती. त्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सदस्यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाट्यगृहे सुरू करण्याची मागणी केल्यानंतर त्यांनी ५ नोव्हेंबरची तारीख दिली होती. मात्र, शासनाच्या वतीने २२ ऑक्टोबरची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
सर्व नियमावली पाळून सादरीकरण करण्याची ग्वाही नाट्य परिषदेच्या वतीने वारंवार देऊनही राज्य शासनाने निर्णयास विलंब केला आहे. गत दीड वर्ष रंगभूमी ठप्प पडल्याने रंगकर्मींच्या आणि विशेषत्वे यावरच उपजीविका अवलंबून असलेल्यांचे प्राणच कंठाशी आले आहेत. मात्र, देर आये दुरुस्त आये, असेच म्हणावे लागेल.
- रवींद्र कदम, अध्यक्ष, नाट्य परिषद, नाशिक शाखा
शासनाने रंगभूमी सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचा आनंदच आहे. या निर्णयाला प्रत्येकाने सकारात्मकपणे घेऊन पुढे जाणे आवश्यक आहे. आता यापुढे सर्व रंगकर्मी आणि पदाधिकाऱ्यांनी सर्व हेवेदावे विसरून रंगभूमीला पुन्हा ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असून, रसिकांनीदेखील सर्व नाटके, कलावंतांना भरभरून प्रतिसाद द्यावा.
प्राजक्त देशमुख, नाटककार
सर्व रंगकर्मींना या निर्णयाने काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र, परिस्थिती बरीचशी हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे शासनाने प्रसारमाध्यमातून केवळ तारखेची घोषणा न करता त्याबाबत सविस्तर जीआर काढून सर्व नाट्यगृह व्यवस्थापनाला त्याबद्दल सूचित करावे. सर्व नाट्यगृहे सुस्थितीत येणे गरजेचे आहे. तसेच नाट्यगृह सुरू झाल्यानंतर शासनाच्या नाट्यगृहांनी पुढील २ वर्षे केवळ पाच हजार भाडे आकारल्यासच रंगभूमी पुन्हा बहरू शकणार आहे.
- जयप्रकाश जातेगावकर, नाट्य कंत्राटदार
मंदिरांबरोबरच रंगमंदिरेदेखील ७ ऑक्टोबरपासूनच सुरू करण्यात यावी, यासाठी आम्ही प्रयत्नरत होतो. मात्र, शासनाने जाहीर केलेल्या २२ तारखेचेदेखील स्वागत आहे. सर्व रंगकर्मींनी आता एकजुटीने रंगभूमी पुन्हा बहरण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी रंगभूमीशी निगडित प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
- सुनील ढगे, कार्याध्यक्ष, नाट्य परिषद, नाशिक शाखा
शासनाच्या निर्णयामुळे नक्कीच दिलासा मिळणार आहे. रंगभूमी बंद होण्यापूर्वीचे कालिदासमधील अखेरचे नाटकदेखील माझेच क्रांतिसूर्य होते, तर २२ ऑक्टोबरला सुरू झाल्यानंतर पहिले नाटकदेखील ‘आषाढातील एक दिवस’ हेच करण्याचा आमचा प्रयास राहणार आहे. रंगभूमी पुन्हा निश्चितपणे बहरेल, असा विश्वास वाटतो.
- राजेश शर्मा, रंगकर्मी आणि निर्माता