राजकीय पक्षांसमक्ष मतदार यंत्रांची सरमिसळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 06:45 PM2019-03-27T18:45:11+5:302019-03-27T18:46:10+5:30
देशाच्या विविध भागांतून नाशिक जिल्ह्यासाठी ही यंत्रे आणण्यात आली आहेत. यापूर्वीच या यंत्राची चाचणी तज्ज्ञांकरवी करण्यात आली असून, आता कोणत्या विधानसभा मतदारसंघासाठी कोणते यंत्र पाठवायचे त्याची निवड सरमिसळ पद्धतीने करायची, जेणेकरून कोणलीही शंका राहू नये.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर देशात सातत्याने एकाच पक्षाच्या होणाऱ्या विजयामुळे निवडणूक आयोगाच्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर राजकीय पक्ष व मतदारांकडून घेण्यात येत असलेल्या संशयाचे निराकरण करण्यासाठी आयोगाने विविध प्रयत्न सातत्याने केले. त्यासाठी सर्वच प्रक्रिया पारदर्शी करण्याबरोबरच आता मतदान यंत्रासोबत व्हीव्हीपॅट यंत्र जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जनतेच्या मनातील संशय दूर होण्यास मदत होईल त्याअनुषंंगाने बुधवारी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमक्ष जिल्ह्याला प्राप्त झालेल्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्रांच्या प्रथम सरमिसळीकरणाची (फर्स्ट रॅण्डमायझेशन) प्रक्रिया पार पाडली. यावेळी पक्ष प्रतिनिधींनी विचारलेल्या शंकांचे निरसन करून त्यांना सरमिसळची पद्धतीही समजावूनही सांगण्यात आली.
अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळ येथे जिल्ह्यातील सर्व मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट यंत्रे ठेवण्यात आली असून, देशाच्या विविध भागांतून नाशिक जिल्ह्यासाठी ही यंत्रे आणण्यात आली आहेत. यापूर्वीच या यंत्राची चाचणी तज्ज्ञांकरवी करण्यात आली असून, आता कोणत्या विधानसभा मतदारसंघासाठी कोणते यंत्र पाठवायचे त्याची निवड सरमिसळ पद्धतीने करायची, जेणेकरून कोणलीही शंका राहू नये. यासाठी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन व व्हीव्हीपॅट यंत्राबाबतच्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना असलेल्या सर्व शंकांचे निरसन करून संपूर्ण मतदान प्रक्रिया समजून घेण्याचे आवाहन केले. जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान केंद्राच्या संख्येपेक्षा २० टक्के जादा मतदान यंत्र संबंधित मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वितरित करण्यात आलेली आहेत. संगणकीय प्रणालीच्या साहाय्याने सरमिसळ प्रक्रियेची पहिली फेरी कशारितीने पूर्ण होईल, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना माहिती दिली.
सदर प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सरमिसळ प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती देताना सांगितले की, सरमिसळ प्रक्रियेंतर्गत मतदारसंघनिहाय यंत्रांचे वाटप होणार आहे. सदर व्हीव्हीपॅट यंत्र वाहतूक करताना अत्यंत काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक आहे. तसेच मतदान केंद्रांपर्यंत व्हीव्हीपॅट मशीन नेताना ते ट्रान्सपोर्ट मोडमध्ये असणे गरजेचे असल्याचेही, त्यांनी प्रत्यक्ष हाताळणी करणाºया कर्मचाºयांना सूचना दिल्या. सरिता नरके यांनी संगणकीय प्रणालीद्वारे प्रथम व द्वितीय सरमिसळ प्रक्रिया कशापद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे, याची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली.
जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघनिहाय ४७२० मतदान केंद्रांना प्रत्येकी ५५१३ बॅलेट व कंट्रोल युनिट आणि ५९६९ व्हीव्हीपॅट यंत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, नोडल अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार राजश्री अहिरराव, प्रशांत पाटील, नायब तहसीलदार अमित पवार यांच्यासमवेत विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.