कमिशन बारा रुपये, खर्च ५१ रुपये !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:51 AM2017-11-07T00:51:26+5:302017-11-07T00:51:37+5:30
फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थींनाच प्रतिकार्ड एक किलो साखर दरमहा देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका रेशन दुकानदारांनाच बसू लागला असून, चार ते चाळीस किलोपर्यंत दरमहा साखर वाटपासाठी मिळणाºया दुकानदारांना मात्र चलन भरताना साखरेच्या मिळणाºया कमिशनपेक्षा चार ते चाळीस पट जादा रक्कम बॅँकेत भरण्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. दुकानदारांच्या या आर्थिक व्यथेशी कोणतेही सोयरसुतक नसलेले पुरवठा खाते मात्र साखर न उचलणाºया दुकानदारांना नोटिसा पाठवून मानसिक छळ करीत असल्याचे धक्कादायक वृत्त आहे.
नाशिक : फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थींनाच प्रतिकार्ड एक किलो साखर दरमहा देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका रेशन दुकानदारांनाच बसू लागला असून, चार ते चाळीस किलोपर्यंत दरमहा साखर वाटपासाठी मिळणाºया दुकानदारांना मात्र चलन भरताना साखरेच्या मिळणाºया कमिशनपेक्षा चार ते चाळीस पट जादा रक्कम बॅँकेत भरण्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. दुकानदारांच्या या आर्थिक व्यथेशी कोणतेही सोयरसुतक नसलेले पुरवठा खाते मात्र साखर न उचलणाºया दुकानदारांना नोटिसा पाठवून मानसिक छळ करीत असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत अंत्योदय योजनेच्या लाभार्थींनाच प्रतिकार्ड एक किलो साखर देण्यात येत असल्यामुळे अंत्योदय योजनेच्या लाभार्थींची संख्या पाहता प्रत्येक रेशन दुकानदारास चार ते चाळीस किलो या प्रमाणातच दर महिन्याला साखरेचा कोटा दिला जातो. या साखरेसाठी दुकानदारांना साखरेवर मिळणाºया कमिशनची रक्कम वजा जाता उर्वरित रकमेचे चलन म्हणजेच बॅँकेत जाऊन पैसे भरावे लागतात. सध्या रेशनवर मिळणाºया साखरेचा दर २० रुपये किलो इतका असून, त्याच्या विक्रीतून दुकानदारास एका किलोमागे दीड रुपया कमिशन म्हणून मिळतो. म्हणजे एका दुकानदाराला जर चार किलोच साखरेचा कोटा मंजूर असेल तर त्याने सहा रुपये कमिशनचे वजा करून ५४ रुपये चलनाद्वारे भरणे अपेक्षित आहे. परंतु ज्या राष्टÑीयीकृत बॅँकेत रेशन दुकानदारांना चलन भरावे लागते त्यात कमीत कमी ३०१ रुपयांचे चलन भरावे लागते. राष्टÑीयीकृत बॅँका तीनशे रुपयांच्या आतील रक्कम चलनाद्वारे भरून घेत नाही. त्यामुळे दुकानदाराला तीनशे रुपयांहून अधिक रक्कम बॅँकेत चलनाद्वारे भरली तरच पुरवठा खाते त्यांना परमीट अदा करते ही वस्तुस्थिती आहे. म्हणजेच रेशन दुकानदाराला चार किलो साखरेच्या सहा रुपये कमिशनसाठी तीनशे रुपयांचा भुर्दंड बसत आहे. त्यामुळे बºयाचशा दुकानदारांना हा घाट्याचा व्यवसाय वाटू लागला असून, ज्यांना चार ते वीस किलोपर्यंत दरमहा साखर मिळते व ज्यांना तीनशे रुपयांच्या आत कमिशनची रक्कम मिळणार आहे अशा दुकानदारांना घरातून रक्कम भरून अंत्योदयच्या लाभार्थींना साखर वाटप करावी लागत आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून दुकानदार नाखुशीने साखरेची उचल करीत असून, काहींनी याच कारणास्तव साखर न उचलल्याने पुरवठा खात्याने त्यांना नोटिसा पाठवून फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे.