साथी अनिताताई म्हणजे रचना, संघर्षाचा मिलाफ होता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:11 AM2021-03-30T04:11:45+5:302021-03-30T04:11:45+5:30
नाशिक : समता आंदोलन, राष्ट्रसेवा दल, छात्रभारतीसारख्या विविध चळवळींतील संघटनांमध्ये कार्यरत नवीन कार्यकर्त्यांची नवीन पिढी निर्मितीचे रचनात्मक काम करण्यासोबतच ...
नाशिक : समता आंदोलन, राष्ट्रसेवा दल, छात्रभारतीसारख्या विविध चळवळींतील संघटनांमध्ये कार्यरत नवीन कार्यकर्त्यांची नवीन पिढी निर्मितीचे रचनात्मक काम करण्यासोबतच विविध आंदोलनाच्या माध्यमातून वंचित, दुर्बल घटकांतील विद्यार्थी, महिलांसाठी संघर्ष करणाऱ्या साथी अनिता पगारे यांच्या ठिकाणी रचना आणि संघर्षाचा अनोखा मिलाफ असल्याचा सूर सोमवारी (दि. २९) साथी अनिता पगारे यांच्या ऑनलाइन शोकसभेत उमटला.
अनिता पगारे यांच्या निधनाने सामाजिक चळवळीत कधीही भरून निघू शकणार नाही, अशी पोकळी निर्माण झाली असून अनिताताई यांच्या रूपाने विद्रोही, बंडखोर आणि रचनात्मक कार्य करणाऱ्या आणि चळवळीची व्यापक समज असलेले अग्रणी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, राष्ट्र सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी, आमदार कपिल पाटील, प्रा. संजय गोपाळ आदींनी व्यक्त केली. तर चळवळीतील प्रत्येकाची मैत्रीण, मार्गदर्शिका आणि प्रचंड सकारात्मक विचारधारा असलेल्या अनिताताई स्त्रीवादी कार्यकर्ता कमला भसीन यांच्याशीही सहज मैत्री निभावताना चळवळीतील इतरांनाही प्रेरणा देणारा ऊर्जास्रोत असल्याचे मत राष्ट्र सेवादलाचे राज्य अध्यक्ष अर्जुन कोकाटे, प्रतिभा शिंदे, ॲड. उत्कर्षा रूपवते. सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी.एल. कराड यांनी व्यक्त केले. महापुरुषांचा जीवन संघर्ष त्यांचा उर्जास्रोत होता. त्यामुळेच कोणत्याही चळवळीतील संघर्षात त्या नेहमीच अग्रेसर राहिल्या. मात्र ज्या काळात खऱ्या अर्थाने लढणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज होती, त्याच काळात त्यांनी चळवळीचा निरोप घेतल्याने मानवतेच्या, माणुसकीच्या आणि समतेच्या चळवळीची कधीही भरून न निघणारी हानी झाल्याचे नमूद करीत ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक उत्तम कांबळे यांच्यासह शांताराम चव्हाण, नितीन मते, सागर भालेराव आदींनी अनिता पगारे यांना श्रद्धांजली अर्पण केली. राजा कांदळकर यांनी सूत्रसंचालन केले.