कंपनीपुढे पेच : जागा संपादनासाठी कराव्या लागणार तडजोडी ‘स्मार्ट रोड’साठी अडथळ्यांची शर्यत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:41 AM2018-03-10T00:41:39+5:302018-03-10T00:41:39+5:30
नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहरातील अशोकस्तंभ ते मोडक सिग्नलपर्यंतचा १.१ कि.मी. रस्ता स्मार्ट करण्याचा निर्णय नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीने घेतला.
नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहरातील अशोकस्तंभ ते मोडक सिग्नलपर्यंतचा १.१ कि.मी. रस्ता स्मार्ट करण्याचा निर्णय नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीने घेतला असला तरी, या स्मार्ट रोडसाठी कंपनीला अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागणार आहे. प्रामुख्याने दुतर्फा प्रत्येकी ७.५ मीटरचा रस्ता करण्यासाठी कंपनीला काही भागात जागा संपादित करावी लागणार असून, त्यासाठी जागामालकांशी तडजोडी कराव्या लागणार आहेत. मोक्याच्या ठिकाणची जागा मिळण्याबाबत कंपनीला कितपत प्रतिसाद मिळेल, याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. स्मार्ट सिटी कंपनीने शहरातील एरिया बेस डेव्हलपमेंट अंतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाक्यावरील मोडक सिग्नलपर्यंतचा १.१ कि.मी. मार्ग ‘स्मार्ट रोड’ म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. सदर रोडलगत फुटपाथ, सायकल ट्रॅक यासह अन्य सुविधा असणार आहेत. स्मार्ट रोडसाठी कंपनीने निविदाप्रक्रिया राबविली होती. परंतु, पहिल्यांदा निविदाप्रक्रियेला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दुसºयांदा निविदाप्रक्रिया राबविली असता त्यात तीन जणांनी निविदा भरल्या असून, येत्या १५ दिवसांत त्याबाबत पुढील कार्यवाही केली जाणार आहे. कंपनीने स्मार्ट रोडचा आराखडाही बनविला आहे. आराखड्यानुसार, दुतर्फा ७.५ मीटर जागा रस्त्यासाठी सोडून उर्वरित जागेत फुटपाथ, सायकल ट्रॅकची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. परंतु, ७.५ मीटर जागा सोडताना मेहेर ते अशोकस्तंभ आणि सीबीएस सिग्नल ते मोडक सिग्नल या दरम्यान दुतर्फा जागा संपादित करण्याचे आव्हान कंपनीपुढे असणार आहे. जागामालकांकडून काही प्रमाणात जागा घेताना त्यांना महापालिकेकडून टीडीआरसारखे लाभ देता येतील काय, यादृष्टीने कंपनीने चाचपणी सुरू केली आहे. लवकरच संबंधित जागामालकांची बैठक बोलावून त्यांचीही मते जाणून घेण्यात येणार आहेत. तडजोडीच्या माध्यमातून जागा संपादनासाठी प्रसंगी महापालिकेची मदत घेतली जाणार असल्याची माहिती कंपनी सूत्रांनी दिली आहे.