काम करणाऱ्यांपेक्षा न करणाऱ्यांनीच मतदारांचे मानले आभार भाजपत श्रेयवादाची स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 01:27 AM2019-10-26T01:27:31+5:302019-10-26T01:27:49+5:30
नाशिक : नाशिक शहरातील तिन्ही जागा भाजपने जिंकल्यानंतर श्रेय घेण्यास अनेक जण सरसावणे स्वाभाविक आहे,
नाशिक : नाशिक शहरातील तिन्ही जागा भाजपने जिंकल्यानंतर श्रेय घेण्यास अनेक जण सरसावणे स्वाभाविक आहे, मात्र ज्यांनी पक्षाचे काम केले नाही असे अनेक जणदेखील मतदारांचे बल्क एसएमएस आणि सोशल मीडियावर आभार मानत असल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.
निवडणुकीत अनेक पक्षांतील अनेक जण इच्छुक असतात. विशेषत: सत्ताधारी किंवा संभाव्य विजेत्या पक्षांकडे इच्छुकांची रांग असते. नाशिक शहरातील तीन जागा भाजपकडे असल्याने साहजिकच इच्छुकांची स्पर्धा अधिक होती; परंतु पक्षाने आपल्या ध्येय धोरणानुसारच उमेदवारी दिली आणि त्यामुळे पक्षातील अनेक जण नाराज झाले. परंतु त्यातील अनेकांची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश आले आणि ते कामालाही लागले. नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपने अनेक जण इच्छुक होते त्यांनीदेखील नंतर पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे काम केले. महापालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासूनच मतदारसंघ पिंजून काढला होता आणि जनसंपर्कासाठी अनेक उपक्रम राबवून पूर्णत: तयारी केली होती; मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी पक्षाचा निर्णय मान्य असे म्हणून सीमा हिरे यांच्या प्रचाराची धुरा घेतली. सातपूरमधून माकपाचे डी. एल. कराड आणि शिवसेनेचे बंडखोर विलास शिंदे उभे असतानाही त्यांना रोखून भाजपला निवडून देण्यात दिनकर पाटील यांची भूमिका मोलाची राहिली. अशाच प्रकारे नाशिक मध्यमधील भाजपचे इच्छुक उमेदवार वसंत गिते यांना पक्षाने संधी नाकारली. मात्र, त्यानंतरदेखील त्यांच्याकडे पश्चिम नाशिकची जबाबदारी दिली आणि त्यांनीदेखील त्यात लक्ष घालून यश मिळवून दिले.
नाशिक पूर्वमध्ये बाळासाहेब सानप यांना उमेदवारी नाकारल्यानंतर या पक्षातील उद्धव निमसे यांनी अखेरपर्यंत उमेदवारीसाठी प्रयत्न केले. परंतु पक्षाने अॅड. राहुल ढिकले यांना उमेदवारी दिल्यानंतर निमसे हे प्रचारात कार्यरत झाले. अशाच प्रकारे तिन्ही मतदारसंघातील अनेक भाजप इच्छुकांनी नंतर मात्र पक्षावर निष्ठा ठेवून कामकाज केले. त्यामुळे यशात त्यांचा वाटा मोलाचा राहिला आहे.