नाशिक : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत यंदाच्या शैक्षणिक वर्षातील पायाभूत चाचणी पार पडल्यानंतर आता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची संकलित मूल्यमापन चाचणी एक सोमवार (दि.२२) पासून घेतली जाणार आहे. यंदाची पहिली संकलित चाचणी राज्यस्तरावरून घेता ती शाळास्तरावर होणार आहे. या चाचणीसाठी प्रश्नपत्रिका व शिक्षक सूचनापत्र शाळांना स्थानिक स्तरावरच तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, दिवाळीपूर्वीच ही चाचणी पूर्ण होणार आहे.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणारी अध्ययन निष्पत्तीवर आधारित पायाभूत चाचणी दि. २८ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत घेण्यात आली. या चाचणीचे गुणही सरलमध्ये भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे गुण भरल्यानंतर शिक्षकांना त्याच्या वर्गाचा संबंधित विषयाचा निकाल, अध्ययन निष्पत्तीनिहाय वर्गाची संपादणूक सरल प्रणालीमध्ये उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे शिक्षकांना सोपे होत आहे. विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादणूक क्षमता समजल्याने शिक्षकांना त्याप्रमाणे अध्यापन योजना करणे शक्य असून, विद्यार्थी विषयनिहाय कोणत्या अध्ययन निष्पत्तीमध्ये मागे आहे याची माहिती शिक्षकांना सरल प्रणालीच्या माध्यमातून उपलब्ध होते. त्यानुसार अधिकाधिक विद्यार्थी ज्या अध्ययन निष्पत्तीच्या मागे आहेत, त्यावर आधारित प्रश्नपत्रिका तसेच अध्यापनावर भर देणे शिक्षकांना शक्य होणार आहे.
पहिली ते आठवीची आजपासून संकलित चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 1:20 AM