स्त्री रुग्णालयाविरोधात पालकमंत्र्यांकडे गार्हाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 02:04 PM2017-10-30T14:04:44+5:302017-10-30T14:08:01+5:30
नागरिकांचा विरोध : सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन
नाशिक : भाभानगर येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहालगत स्त्री रुग्णालयास जागा देण्यास स्थानिक नगरसेवकासह नागरिकांनी विरोध तीव्र करत सोमवारी (दि.३०) पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन साकडे घातले. यावेळी, पालकमंत्र्यांनी सदर रुग्णालयाच्या जागेबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन नागरिकांना दिले.
भाभानगर येथील स्त्री रुग्णालयाला जागा देण्यावरून भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार वसंत गिते यांच्यातील वाद पेटला आहे. मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महापौरांना तातडीने भाभानगरच्या जागेचा ठराव करून देण्याचे आदेशित केले होते. त्यामुळे भाभानगरच्या नागरिकांसह स्थानिक नगरसेवक व उपमहापौर प्रथमेश गिते यांनी सोमवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर वस्तुस्थिती कथन केली. भाभानगर येथे स्त्री रुग्णालयाला जागा दिल्यास परिसरातील कायदा व सुव्यवस्थेसह नागरिकांना येणाऱ्या अडचणींचा पाढा यावेळी पालकमंत्र्यांसमोर वाचण्यात आला. पालकमंत्र्यांनी नागरिकांची म्हणणे ऐकून घेत रुग्णालयाच्या जागेबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाभानगर ज्येष्ठ नागरिक बहुउद्दिष्ट सेवा समितीचे अध्यक्ष पी. व्ही. क्षीरसागर, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर, श्रीमती पटेल, चंद्रकांत थोरात, मिलिंद भालेराव आदींसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.