नायगाव : सिन्नर तालुक्यातील मोहदरी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या गळक्या वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.जिल्हा परिषदेच्या नायगाव गटातील मोहदरी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीची मोठया प्रमाणात दुरावस्था झाली आहे. शाळेच्या सर्वच वर्गांच्या पत्र्यांचे नुकसान झाले आहे. नादुरूस्त वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थी ज्ञानार्जन करतांना भीतीच्या सावटाखाली वावरत आहे. त्यातच सध्याच्या पावसात हे गळतीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासुन सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गळक्या खोल्यामंध्येच वर्ग भरत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. अशा गळक्या वर्गात दिवसभर बसण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येत आहे. सतत ओल्या जागेवर बसून पायांना मुंग्या व वात येण्यासारखे आजारांचा सामना करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येत आहे. पावसाच्या दिवसात विद्यार्थी शाळेत गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढत असल्याने शिक्षक नाराजी व्यक्त करत आहे. या इमारतीच्या दुरु स्तीकडे संबंधित विभाग जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाने कोणताही अनचित प्रकार घडण्याच्या आधीच शाळा इमारतीच्या दुरूस्तीकडे लक्ष देण्याची मागणी पालकांबरोबर ग्रामस्थांनी केली आहे.
मोहदरी येथे गळक्या वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 5:41 PM