नाशिक : जिल्हा परिषदेच्या ७३ गट व १४६ गणांसाठी काँग्रेसने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. प्रत्येक तालुक्यात पक्षाकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी संख्या आहे. जिल्हा पातळीवर २६ जानेवारीपर्यंत उमेदवारांची यादी तयार करून प्रदेश काँग्रेसला पाठविली जाईल. प्रदेश पातळीवरून ३१ जानेवारीला उमेदवार जाहीर केले जाणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे प्रभारी आमदार के. सी. पाडवी यांनी दिली. जिल्हा काँग्रेस कमिटीत सोमवारी (दि.१६) पक्षाच्या ७३ गटासाठी व १४६ गणांसाठी इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार पाडवी बोलत होते. पंधरा तालुक्यांतील ७३ गटांसाठी स्वतंत्ररित्या तसेच १४६ गणांसाठी इच्छुकांच्या मुलाखती झालेल्या आहेत. सत्ताधारी भाजपा व शिवसेना विरोधात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करावी, असा सूर काही तालुक्यांतून आला आहे. मात्र, आघाडी करण्याचा अधिकारी तालुकास्तरावर देण्यात आलेले आहे. तालुक्यातील समितीने समविचारी पक्षांशी चर्चा करून जागावाटप निश्चित करावी. निवडून येण्याची क्षमता व एकनिष्ठ कार्यकर्ता या निकषावर उमेदवारी निश्चित केली जाणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या भांडणाचा फायदा सेना-भाजपास होऊ नये यासाठी काही ठिकाणी आघाडी करावी लागेल, असे आमदार पाडवी यांनी यावेळी सांगितले. तालुकापातळीवरील समिती २५ जानेवारीपर्यंत उमेदवारांची यादी तयारी करती. २६ जानेवारीला जिल्हा निवड समितीची बैठक होऊन ही यादी प्रदेशाला पाठविली जाईल. ३१ जानेवारीला प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत उमेदवारी यादी अंतिम करून जाहीर केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार निर्मला गावित, माजी आ. शिरीष कोतवाल, नानासाहेब बोरस्ते, प्रभारी श्याम सनेर, सुनील आव्हाड, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कॉँग्रेस करणार ३१ जानेवारीला उमेदवारांची घोषणा
By admin | Published: January 17, 2017 1:29 AM