कॉँग्रेस करणार निवडणूक निधी गोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:34 AM2018-11-24T00:34:55+5:302018-11-24T00:35:12+5:30
आगामी लोकसभा व महाराष्टÑातील विधानसभा निवडणुकीला पूर्ण ताकदीनिशी सामोरे जाण्यासाठी कॉँग्रेस पक्षाने जोरदार तयारी चालविली असून, पक्षाच्या जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्षापासून दुरावलेल्या कार्यकर्त्यांना जोडण्याबरोबरच, पक्षचिंतकांकडून निधीही गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. रोख व धनादेशाच्या स्वरूपात गोळा करण्यात येणारे पैसे पक्ष कार्यासाठी वापरण्यात येणार आहेत.
नाशिक : आगामी लोकसभा व महाराष्टÑातील विधानसभा निवडणुकीला पूर्ण ताकदीनिशी सामोरे जाण्यासाठी कॉँग्रेस पक्षाने जोरदार तयारी चालविली असून, पक्षाच्या जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्षापासून दुरावलेल्या कार्यकर्त्यांना जोडण्याबरोबरच, पक्षचिंतकांकडून निधीही गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. रोख व धनादेशाच्या स्वरूपात गोळा करण्यात येणारे पैसे पक्ष कार्यासाठी वापरण्यात येणार आहेत.
सत्तेवरून दूर गेल्यानंतर पहिल्यांदाच कॉँग्रेस पक्षाच्या देणगीदारांची संख्या घटली असून, सन २०१७-१८ मध्ये पक्षाला फक्त २७ कोटी रुपये पक्ष निधी मिळालेला आहे. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीला शस्त्र, सामुग्रीसह सामोरे जाण्यासाठी पैशांची मोठी कमतरता भासणार असल्याने पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून देशपातळीवर लोकवर्गणीही गोळा करण्याची मुभा सर्वच प्रदेश कॉँग्रेस कमिट्यांना देण्यात आली आहे. महाराष्टÑात या अभियानाची सुरुवात प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातून सुरूवात करण्यात आली, त्यानंतर राज्यातील दुसरा जिल्हा म्हणून नाशिकची निवड झाली आहे.
या अभियानादरम्यान, केंद्र व राज्यातील सरकारने जनहित विरोधी घेतलेल्या निर्णयाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याबरोबरच कॉँग्रेस पक्षाच्या राजवटीत आजवर घेतलेल्या जनहित निर्णयाची माहिती पक्ष कार्यकर्ते घरोघरी जाऊन देणार आहेत. त्यासाठी प्रचारपत्रके प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील किमान एक लाख कुटुंबापर्यंत हे पत्रक पोहोचविण्याचे उद्दिष्ट जिल्हा कमिट्यांना देण्यात आले, मात्र हे पत्रक हाती ठेवतानाच जनतेकडून पक्ष निधीची स्वच्छेने पावती फाडण्याची विनंतीही केली जाणार आहे. त्यात पक्ष निधी म्हणून इच्छेनुरूप देणगी देण्याची व घेण्याची मुभा परस्परांना देण्यात आली आहे.
नाशिक येथे गुरुवारी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या उपस्थितीत या जनसंपर्क अभियानाची सुरुवात करण्यात येऊन स्वत: चव्हाण यांनी टिळकवाडीतील भुपेंद्र शहा यांच्या घरी जाऊन पत्रकाचे वाटप तर केलेच, परंतु त्यांच्याकडून ११ हजार रुपयांची घसघशीत रक्कमही पक्षनिधी म्हणून जमा केले तर चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेच्या स्थळी सुधाकर मुळाणे यांनी पाच हजार रुपये पक्ष निधी म्हणून दिले. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुमारे दहा लाख व नाशिक शहरात चार लाख अशा पंधरा लाख प्रचार पत्रकांच्या माध्यमातून जनतेपर्यंत कॉँग्रेस पोहोचणार आहे. पक्ष निधी किती गोळा करायचा याचे मात्र पक्षाने उद्दिष्ट दिलेले नाही.