त्र्यंबकेश्वर : हरसूल येथे सोमवारपासून (दि.४) सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत अतिक्रमणविरोधी मोहीम पोलिसांच्या कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरू असून, या मोहिमेत जवळपास अतिक्रमित ३५० दुकानांवर हातोडा पडला.
नाशिक- हरसूल- ठाणापाडा या राज्य महामार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून लोकांनी अतिक्रमण करून दुकाने टाकून व्यवसाय सुरू केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण हटविण्यासंबंधी वारंवार सूचना केल्या होत्या. परंतु, व्यावसायिक त्याला दाद देत नव्हते. या रस्त्यावर अनेकवेळा छोटे-मोठे अपघात घडल्याचे सांगितले जाते. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारपासून जेसीबी, ट्रॅक्टर आदींच्या साहाय्याने काढणार असल्याच्या नोटिसा अतिक्रमणधारकांना दिल्या होत्या. त्यानुसार वीज वितरण उपकेंद्रापासूनअतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. काहींनी नुकसान व्हायला नको म्हणून स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली तर काहींच्या दुकानांची मोडतोड झाली. या मोहिमेमुळे पीडब्ल्यू हद्दीतील सर्व रस्ता मोकळा झाला आहे.
इन्फो
विस्थापितांचे होणार पुनर्वसन
या मोहिमेमुळे विस्थापित झालेल्या व्यावसायिकांचे पुनर्वसन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच नितीन देवरगावकर यांनी दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती गाळे काढणार असून, काही व्यावसायिक तिथे तर ग्रामपंचायत भविष्यात गाळे काढणार असून, उर्वरित व्यावसायिकांचे तेथे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
इन्फो
अनेकांनी स्वत:हून काढले अतिक्रमण
अनेक व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करून स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच बांधकाम विभागाचे उपअभियंता संदीप पांडांगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले, हरसूलचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे आदींनी शांततेचे आवाहन केले होते. कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेच्या वातावरणात मोहीम पार पडली.
फोटो- ०७ हरसूल २/३