नाशिक : लोकमान्य टिळकांनी विधायक हेतूने सुरू केलेल्या गणेशोत्सवाला आज व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. शतकांपासून सुरू झालेल्या या दहा दिवसीय उत्सवात कालानुरूप अनेक बदल होत गेले. काळ बदलला तशा अनेक चांगल्या-वाईट गोष्टी यात येत गेल्या; मात्र दुर्दैवाने गणेशोत्सवात अनेक वाईट गोष्टी, पर्यावरणाला घातक गोष्टी वाढत चालल्या आहत. यामुळे सूक्ष्म स्तरावर मानवी जीवनच धोक्यात आले आहे, या गोष्टींना वेळीच पायबंद घातला गेला पाहिजे, असे मत लोकमतच्या व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. याशिवाय प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती, थर्माकोलची मखरे, डीजेचा दणदणाट, मूर्तींच्या उंचीची लागलेली स्पर्धा या गोष्टी थांबल्या पाहिजेत, नवीन पिढीला आपण काय संस्कार देतो याचा आजच्या पिढीने विचार केला पाहिजे, असे मत नाशिकमधील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या या संवेदनशील व्यक्तींनी व्यक्त केले. ‘लोकमत’च्या विचार-विमर्शच्या व्यासपीठावर झालेल्या चर्चेत माधुरी भदाणे, कैलास ठाकरे, मंजूषा व्यवहारे, अनुपमा देवरे, वैशाली डुंबरे, पराग चौधरी, मनोरमा पाटील, चारुशीला देशमुख, विलास ठाकरे, विशाल गांगुर्डे, आकाश पगार, स्वप्नील पाटील आदींनी सहभाग घेतला. पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही आज काळाची गरज बनली आहे. उद्याचे सुजाण नागरिक असणारे आजची लहान मुले यांना यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी करून घ्यावे. विशेषत: गरीब, ग्रामीण भागातील मुलांना मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण द्यावे. जेणेकरून ते त्यातून रोजगारही मिळवू शकतील. शेतातील मातीच्या गणेशमूर्तीला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. अंकुर गणपतीलाही प्राधान्य मिळावे. मूर्तींवर रंगांचा कमीत कमी वापर केला जावा. - चारुशीला देशमुख, संचालक, आश्रमशाळाप्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती या पर्यावरणाला घातक ठरू शकतात. मूर्ती अनेक विषारी व जलप्रदूषण जबाबदार असलेल्या घातक रंगांनी रंगविली जाते. हे रंग जलप्रदूषणास कारणीभूत ठरतात. जलसृष्टी धोक्यात येते. डीजे किंवा कर्कश आवाजात वाजविल्या जाणाºया गाण्यांमुळे लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती यांना त्रास होतो. हे प्रकार थांबले पाहिजे. गणेशोत्सवात शांत आवाजातले, सकारात्मक गाणे वाजावेत, अश्लील, विचित्र अर्थाचे गाणे लावले जाऊ नये. गणेशोत्सव आरोग्यदायी असायला हवा. - डॉ. अनुपमा मराठे-देवरेगणेशमूर्ती संकलनाला भाविकांचा दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत चालला आहे. लोक श्रद्धेने आणि विश्वासाने या मूर्ती दान करीत आहेत. त्यामुळे सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देण्याचे काम महानगरपालिकेने करावे. मुलबक प्रमाणात ट्रक, ट्रॅक्टर उपलब्ध करून द्यावेत. निर्माल्य, कचरा यांच्या वर्गीकरणाचे महत्त्व त्यांना पटवून द्यावे. जनप्रबोधनासाठी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करावेत. नाशिकने सेट केलेला मूर्तिदानाचा पॅटर्न देशभर पसरला पाहिजे. दान केलेल्या मूर्तींचे पुढे काय होते, ते भाविकांना समजेल, त्यातून व्यापक प्रमाणात जनजागृती होईल यावर महानगरपालिकेने भर द्यावा. - विशाल गांगुर्डे, विकास ठाकरे, पराग चौधरी, कार्यकर्ते, विद्यार्थी कृती समिती
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी हवे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:33 AM