मनपाचे सभागृह होणार थंडा थंडा कूल कूल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 01:08 AM2019-08-12T01:08:28+5:302019-08-12T01:09:08+5:30
महापालिकेच्या राजीव गांधी भवनातील सभागृहात गेल्याच महिन्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने नगरसेवक संतप्त झाले होते. आधीच असह्य उकाडा त्यात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नगरसेवकांच्या संतापाचा बांध फुटला असला तरी आता मात्र हे सभागृह थंडा थंडा कूल कूल राहील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात सभागृहातील वातावरण गरम होणार नाही, असाही अंदाज प्रशासकीय अधिकारी व्यक्त करीत आहेत.
नाशिक : महापालिकेच्या राजीव गांधी भवनातील सभागृहात गेल्याच महिन्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने नगरसेवक संतप्त झाले होते. आधीच असह्य उकाडा त्यात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नगरसेवकांच्या संतापाचा बांध फुटला असला तरी आता मात्र हे सभागृह थंडा थंडा कूल कूल राहील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात सभागृहातील वातावरण गरम होणार नाही, असाही अंदाज प्रशासकीय अधिकारी व्यक्त करीत आहेत.
गेल्यावर्षी सभागृहात एअर कुलिंग बसविण्याचे काम मंजूर होते, परंतु ते रखडले होते मात्र आता महापालिकेने तातडीने हे काम सुरू केले आहे.
विधिमंडळाच्या धर्तीवर महापालिकेने १९९४ साली ही इमारत बांधली आहे. त्यातील सभागृहदेखील आगळ्यावेगळ्या पद्धतीचे असल्याने त्यावेळी सभागृहात वातानुकूलित यंत्रे नव्हती. आता मात्र त्याची गरज भासू लागली आहे. सभागृहात पंखे असले तरी त्यातील अनेक पंखे बंद होते. महापौरांच्या पीठासनावर महापौर, उपमहापौर आणि आयुक्त विराजमान असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी त्याठिकाणी एअर कुलरची सोय केली जाते, परंतु अन्य नगरसेवकांची मात्र गैरसोय होत असते. त्यातच गेल्या महिन्यात महासभेच्या वेळी तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे सुरुवातीला अर्धा तास आणि नंतर एक तास सभागृहातील कामकाज स्थगित करावे लागले. त्याचवेळी असह्य उकाड्याने त्रस्त झालेल्या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र, अधिकारी सुधारले आणि आता सभागृह तातडीने कुल कूल करण्याची तयारी सुरू केली.