कोराेनाची पुन्हा धोक्याची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2021 01:10 AM2021-11-20T01:10:39+5:302021-11-20T01:10:57+5:30
शहरासह जिल्ह्यात कोरोनाची पुन्हा धोक्याची घंटा वाजत असून, रुग्णसंख्या पाचशेच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचल्याने आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेच्या चिंता वाढल्या आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ग्रामीण भागातील २६३ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, सिन्नर आणि निफाड तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांचा आलेख खाली-वर होत असून, तेथील रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे.
नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोनाची पुन्हा धोक्याची घंटा वाजत असून, रुग्णसंख्या पाचशेच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचल्याने आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेच्या चिंता वाढल्या आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ग्रामीण भागातील २६३ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, सिन्नर आणि निफाड तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांचा आलेख खाली-वर होत असून, तेथील रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे. दिवाळीनंतर कोरोनाची लाट येण्याची शक्यता एकीकडे वर्तवली जात असतानाच, जिल्ह्यात गेल्या काही दिवसात रुग्णसंख्येत होणारी घट दिलासा देणारी ठरत होती. मात्र, आता गेल्या दोन दिवसांपासून रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसून येत असून, त्यामुळे आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. सद्यस्थितीत नाशिक तालुक्यात ४२, बागलाण - ५, चांदवड-२४, देवळा -६, दिंडोरी-७, इगतपुरी- १०, कळवण -१, मालेगाव -४, नांदगाव-३, निफाड - ६४, सिन्नर- ८०, सुरगाणा-२, त्र्यंबकेश्वर-२ आणि येवला तालुक्यात १३ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्या ४७१ झाली असून, ती पाचशेच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे ही धोक्याची घंटा मानली जात आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोंडलेल्या स्थितीत असलेल्या नागरिकांनी यंदा निर्बंध शिथिल झाल्यामुळे दिवाळीचा आनंद मनसोक्त लुटला. बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. कोरोनाच्या नियमांना तिलांजली दिली गेली. परिणामस्वरूप संसर्ग वाढून रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. आता तुळशीच्या लग्नानंतर विवाह मुहूर्त भरपूर आहेत. त्यामुळे या सोहळ्यांनाही मोठया प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. शिवाय, जिल्ह्यात शाळा-महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे संसर्गाचा धोका आणखी वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य व जिल्हा प्रशासनाच्या यंत्रणेला अधिक जागरुक राहावे लागणार आहे.