जळगाव नेऊर : येवला तालुक्यात ग्रामीण भागातील आठवडे बाजार बंद झाल्यामुळे,, त्याचा फटका शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला बसत असून, अनेक शेतकऱ्यांना भाजीपाला शेतातच सोडून देण्याची वेळ आली आहे. अगोदरच भाजीपाला पिकातून शेतकऱ्यांचा खर्चही वसूल झालेला नाही, त्यातच कोरोना संकटामुळे अनेक ठिकाणी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतल्याने, त्याचा फटका मात्र भाजीपाल्याला बसत आहे.जळगाव नेऊर परिसरात अनेक शेतकऱ्यांनी कांद्याचे रोप न मिळाल्यामुळे भाजीपाल्याला पसंती दिली, परंतु त्याचेही उत्पादन जास्त झाल्याने, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने विक्री करावे लागत आहे. गेली आठ दिवसांपासून कोरोनामुळे आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय अनेक ग्रामपंचायतींनी घेतल्याने, बारमाही भाजीपाला उत्पादन घेऊन आपल्या प्रपंचाचा गाडा चालविणाऱ्या कुटुंबाचे हाल होत आहेत. शासनस्तरावर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी येवला तालुक्यातील विविध गावांतील आठवडे बाजार बंदमुळे त्यावर आधारित भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्री करता येत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तोडून ठेवलेला माल कुठे विक्री करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे, तर काही शेतकऱ्यांनी भाजीपाला शेतात सोडून दिला आहे.
पर्यायाने भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, ऐन उन्हाळ्यात भाजीपाला पिकातून चार पैसे पदरात पडतील. या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना मात्र या नुकसानीमुळे त्यांच्या प्रपंचाचा गाडा कसा चालवावा व उधार, उसनवारी करून शेतीसाठी घेतलेला पैसा कसा फेडावा, हा यक्षप्रश्न भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे, तसेच भाजीपाला ठोक खरेदीतून चिल्लर विक्री करणारे फेरीवाले, शेतमजूर यांच्यावर आठवडी बाजार बंदमुळे उपासमारीची वेळ आली आहे.मी पन्नास गुंठे क्षेत्रावर वाट्याने कोबीची लागवड केलेली आहे. या क्षेत्रावर सोळा हजार काडी कोबीची लागवड केलेली असून, त्यासाठी साठ हजार रुपये खर्च झालेला आहे. कोबी आठवडे बाजारात विक्री करत होत़ो, पण अचानक अनेक ग्रामपंचायतींनी आठवडे बाजार बंद केल्यामुळे कोबी मात्र शेतातच पडून आहे.- राजेंद्र पानसरे, कोबी उत्पादक शेतकरी