नाशिक : कोरोनाचे जगावरील महासंकट अजूनही टळले नाही. त्यामुळे कोरोनावर उपचारासाठी लस शोधण्याची जागतिक पातळीवर स्पर्धा सुरू आहे. आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटी अॅस्ट्रा झेनेका या बहुराष्टÑीय औषध कंपनीच्या संशोधनाला यश मिळत असल्याचे बघून सध्या साऱ्या जगाच्या आशा पल्लवित झाल्या आहे. भारतातच उत्पादन होणार असल्याने भारतातदेखील उत्सुकता आहे. मात्र, पुढील वर्षीच या लसीचे उत्पादन सुरू होऊ शकेल. परंतु यातील वितरण आणि अन्य महत्त्वाचे मुद्दे बघितले तर पुढील स्वातंत्र्य दिनापर्यंत ही लस सर्वसामान्यांना निश्चितपणे उपलब्ध होऊ शकेल, असे मत नाशिक जिल्हा मराठा विद्यापीठाच्या फार्मसी कॉलेजचे उपप्राचार्य आणि औषधी निर्माण क्षेत्रातील तज्ज्ञ प्रा. मिलिंद वाघ यांनी व्यक्त केले.
प्रा. वाघ हे गेल्या पंचवीस वर्षांपासून औषध निर्माण महाविद्यालयाात अध्यापन करीत आहेत. पुणे विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीचेदेखील ते सदस्य आहेत. तसेच शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्या माध्यमातूनदेखील ते सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत.कोरोनाच्या लस उपलब्धतेबाबत त्यांच्याशी साधलेले संवाद..
प्रश्न- सध्या कोरोना लसीबाबत बरीच चर्चा आहे. अनेक देश यासंदर्भात दावे- प्रतिदावे करीत आहेत.प्रा. वाघ- कोरोनाच्या संकटामुळे लस शोधण्यासाठी अनेक देश आणि औषध कंपन्या प्रयत्न करीत आहेत. त्यातही तीसेक संस्था आणि कंपन्या प्रयत्न करीत असल्या तरी सद्यस्थितीत आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटीने घेतलेल्या चाचण्यांचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. त्यांचे संशोधन अत्यंत पारदर्शक असून, त्याचे निष्कर्षदेखील ते जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत. साहजिकच त्यांची लस लवकर उपलब्ध होईल अशी स्थिती आहे.
प्रश्न- कोरोना लसीबाबत सध्या सुरू असलेली प्रक्रिया काय आणि ती कधीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.प्रा. वाघ- तसे बघितले तर कोणतीही लस तयार करण्याचे वेगवेगळे टप्पे आहेत. कोणतीही लस किंंवा औषध तयार केल्यानंतर त्याची उपयुक्तता आणि ्रअपायकारकता तपासल्या जातात. संशोधनाअंति उत्पादित करण्यात आलेले औषध मानवासाठी कितपत सुरक्षित आहे, हे त्यातून तपासले जाते. औषधापूर्वी संशोधन करतानाचे तीन टप्पे असतात. प्री क्लिनिकल (प्राण्यावर)/क्लिनिकल (मानवावर) ट्रायल घेतल्या जातात. या तीन टप्प्यांनंतरचे निष्कर्ष अन्न आणि औषध प्रशासनाला पाठविले जातात आणि त्यांच्या संमतीनंतरच उत्पादन करता येते. त्यामुळे यात कोणत्याही प्रकाराचा शॉर्टकट वापरता येत नाही. कारण थोडीशी चूक जिवावर बेतू शकते. शास्त्रोक्त पद्धतीने लस किंवा औषध तयार करायचे तर आठ ते दहा वर्षांचा कलावधी लागतो. मात्र, जागतिक स्तरावरील एकूणच कोरोनाबाबतची स्थिती बघता चाचण्यांसाठी कमी कालावधी करून लवकर लस बाजारात यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या सर्व प्रक्रियेत आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटी खूपच पुढे आहे.
प्रश्न- आॅक्सफर्डच्या लसीबाबतची प्रगती काय आणि ती कधीपर्यंत उपलब्ध होऊ शकते?प्रा. वाघ- आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटीने जानेवारी महिन्यातच कोरोनाचे जेनेटिक मटेरियल शोधले. त्यासंदर्भातील त्यांचे संशोेधन अमेरिकेच्या लॅनसेट जर्नलमध्ये प्रसिद्धदेखील झाले आहेत. अशाप्रकारचे संशोधन जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यापूर्वी तज्ज्ञ तपासून घेतात. या युनिव्हर्सिटीची जुलै महिन्यात तिसरी चाचणी (फेज थ्री क्लीनीकल ट्रायल) सुरू झाली आहे. आॅक्टोबर महिन्यापर्यंत या चाचणीचे निष्कर्ष बाहेर पडतील. त्यानंतर उत्पादनासाठी हा विषय पुढे जाईल. औषधासंदर्भात संशोधन, उत्पादन आणि वितरण हे तीन टप्पे असतात. त्यात भारतातल्या सिरम इन्स्टिट्यूट या कंपनीने उत्पादन करण्याचा करार केला आहे. त्याचे उत्पादन झाल्यानंतरदेखील उत्पादित लसींपैकी पन्नास टक्के भारतासाठी द्याव्या लागतील आणि उर्वरित विदेशात देता येतील अशा प्रकारचा करार केंद्र शासनाने केल्याचे सिरमचे पुनावाला यांचे म्हणणे आहे. या सर्वांचा विचार केला तर पुढील वर्षीच लस उपलब्ध होतील. देशात ज्या ठिकाणी गरज आहे, त्याठिकाणी प्राधान्य देताना प्रथमत: कोरोना योद्धांचा विचार करावा लागेल. भारतीय आरोग्य व्यवस्था लसीकरणासाठी अत्यंत सक्षम आहे. त्यामुळे त्याला अडचण नाही. भारताला लस बनविण्याचा पहिला बहुमान मिळेल. मात्र घाईगर्दी नको. आज जगात सर्वच ठिकाणी राजकारण सुरू असून, लस तयार करतो असे दाखवण्याची धडपड सुरू आहे. भारतात सामान्य नागरिकांच्या हाती ही लस पुढील स्वातंत्र्य दिनापर्यंत उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे.मुलाखत- संजय पाठक