उमराणेत अखेर कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 09:01 PM2020-07-05T21:01:58+5:302020-07-05T21:02:28+5:30
उमराणे : गेल्या चार महिन्यांपासून कोरोना व्हायरस गावात येऊ नये यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडुन विषेश खबरदारी घेण्यात आली असतानाही अखेर उमराणेत एका साठ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने गाव व परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गेल्या चार महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असल्याने स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडुन वारंवार लॉकडाऊन तसेच एक ना अनेक प्रकारे कोरोना प्रतीबंधासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. त्यामुळेच व्यापारपेठेच गाव, बाजार समितीमुळे होत असलेली गर्दी असतानाही आतापर्यंत कोरोना रोखण्यात यश आले होते.परंतु गेल्या आठ दिवसांपूर्वी येथील एका महिलेची तब्येत बरी नसल्याने खाजगी दवाखान्यात उपचार घेतले. परंतु तब्येतीत सुधारणा न झाल्याने नाशिक येथील एका खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. तेथे ३ जुलै रोजी झालेल्या कोरोना चाचणीत अहवाल निगेटिव्ह आला होता.
मात्र पुन्हा दुसर्या दवाखान्यात नेले असता ५ जुलैच्या चाचणी अहवाल हा पॉझिटीव्ह आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. देवळा तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच देवळा पाठोपाठ जास्त लोकसंख्या असलेल्या उमराणे गावातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. यावर उपाययोजना म्हणून आरोग्य विभागाने महिलेच्या परिवाराच्या संपर्कात आलेल्या तिन जणांची देवळा येथील कोविड कक्षात कोरोंटाईन केले आहे.
प्रतिक्रीया -
सदर महिला दवााखान्यात गेल्यानंंतर कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असल्याने तिच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही कोरोना संसर्ग झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गावाची काळजी घेण्याच्या दृष्टीने ही महिला राहत असलेल्या गल्लीला कंटेंटमेंट झोन जाहीर करण्यात आला असून, बाकी गावातील बाजारपेठ आणि कांदा मार्केट बाबत लवकरच व्यापारी वर्गाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. गावात कोरोना ससंर्ग वाढु नये यासाठी नागरिकांनी मास्क घालूनच घराबाहेर पडावे व खबरदारी घ्यावी.
- विलास देवरे, ( माजी सभापती, बाजार समिती उमराणे )