महामंडळाचे नियोजित बस डेपो बनले डम्पिंग ग्राऊंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:10 AM2021-06-19T04:10:13+5:302021-06-19T04:10:13+5:30
नाशिकरोड : दत्त मंदिररोड येथील एसटी महामंडळाच्या डेपोची पडिक जागा ...
नाशिकरोड : दत्त मंदिररोड येथील एसटी महामंडळाच्या डेपोची पडिक जागा केरकचरा, दगड, माती टाकण्याचे ठिकाण झाल्याने या जागेला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी केरकचरा टाकणाऱ्यांवर मनपा प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जात नसल्याने परिसरातील रहिवासी, खेळाडू नाराज झाले आहेत. दत्त मंदिर रोड व आनंदनगरमध्ये जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूला एसटी महामंडळाच्या डेपोची जागा अनेक वर्षांपासून पडिक आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात बाभूळ व इतर झाडेझुडपे उगवल्याने जंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या झाडाझुडपात अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचे अड्डे झाले आहेत. येथे अनेक गैरप्रकार चालतात. केरकचरा, रॉ मटेरियल आणून टाकण्याचे ठिकाण झाले आहे.
मनपाचे अनेक ठेकेदार परिसरात खोदकाम केल्यानंतर त्याठिकाणी सर्रासपणे माती आणून टाकतात. खासगी इमारत, बंगल्यात बांधकामासाठी तोडफोड केल्यानंतर दगड, विटा, माती उरते ती एसटी महामंडळाच्या पडिक जागेत आणून टाकली जाते. मुक्तिधाम - सोमणी उद्यान येथील खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल चालक, दत्त मंदिररोडवरून येणारे - जाणारे हातगाडीवरील खाद्यपदार्थ विक्रेते उरलेले शिळे अन्न या ठिकाणी आणून टाकत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे मोकाट जनावरांचा संचार वाढला आहे. पाऊस पडल्यानंतर फेकलेले अन्न व इतर वस्तू कुजून दुर्गंधी पसरत आहे. मनपा शाळा क्रमांक १२५च्या मैदानावर खेळण्यासाठी व फिरण्यास येणारी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक या सर्वांना त्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. मनपा प्रशासनाने एसटी महामंडळ प्रशासनाला पत्र देऊन त्या ठिकाणी संरक्षक कुंपण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
---चौकट---
महामंडळाच्या पडिक जागेवर केरकचरा, घाण, माती आणून टाकणाऱ्यांवर मनपा प्रशासनाने कठोर आर्थिक दंडात्मक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. याकरिता त्या ठिकाणी मनपा स्वच्छता विभागाचे कर्मचारी दिवसभर फिरतीवर निगराणीसाठी ठेवले पाहिजे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत घेऊन कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई कठोरपणे करण्याची गरज निर्माण झाली आहे.
(फोटो्)
===Photopath===
170621\562517nsk_49_17062021_13.jpg
===Caption===
महामंडळाचे नियोजित बस डेपो बनले डम्पिंग ग्राऊंड