लाचखोर उपनिरीक्षकाला ३ दिवसांची कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2021 01:34 AM2021-10-02T01:34:47+5:302021-10-02T01:35:40+5:30
तीन लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या ग्रामीण पाेलीस दलाच्या पोलीस उपनिरीक्षकासह त्याच्या साथीदाराची न्यायालयाने शुक्रवारी (दि.१) तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. यापूर्वी शहरात राहून तक्रारकर्त्याच्या बेटिंगविषयी माहिती असल्याने त्याचाच फायदा घेत उपनिरीक्षकाने लाच मागितली.
नाशिक : तीन लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या ग्रामीण पाेलीस दलाच्या पोलीस उपनिरीक्षकासह त्याच्या साथीदाराची न्यायालयाने शुक्रवारी (दि.१) तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. यापूर्वी शहरात राहून तक्रारकर्त्याच्या बेटिंगविषयी माहिती असल्याने त्याचाच फायदा घेत उपनिरीक्षकाने लाच मागितली.
नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक संशयित महेश वामनराव शिंदे याने त्याचा खासगी साथीदार संजय आझाद खराटे याच्या माध्यमातून आयपीएल सटट्याच्या जुगाराचा धंदा सुरळीत करून देण्यासाठी तक्रारदाराकडून ४ लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील, जयंत शिरसाट, मीरा अदमाने यांच्या पथकाने सापळा रचून या दोघांनाही तीन लाख रुपये लाच घेताना पकडले होते. या दोघांंना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने दोघांचीही तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. महेश शिंदे यापूर्वी नाशिक शहरात कार्यरत असताना, संबंधित तक्रारदारावर यापूर्वी छापा टाकण्याच्या पथकात असल्याने त्याला विषय माहिती होता. त्यामुळे बदली झाल्यानंतरदेखील त्याने संबंधीताला तुझा व्यवसाय चाल आहे, हे मला माहिती आहे, असे सांगून लाच मागितली होती, असे तपासात आढळले आहे.