न्यायालयीन दाव्यांवरच खल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:41 AM2019-09-23T00:41:27+5:302019-09-23T00:41:49+5:30

कोणत्या न्यायालयात किती खटले प्रलंबित आहेत? त्यांची सध्याची स्थिती काय आहे? त्यांच्याबाबत काही समेटाचे प्रयत्न सुरू आहेत का? खटल्यांचे कामकाज कोण पाहत आहे? त्यांचे शुल्क किती? त्याबाबतच्या समितीची बैठक होते का? विद्यमान कार्यकारिणीतीलच काही सदस्य त्यात सहभागी असताना खटल्यांमध्ये तडजोड का केली जात नाही? यासारख्या केवळ न्यायालयीन लढाईच्या मुद्द्यांवरच सावानाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निम्म्याहून अधिक वेळेचा कालापव्यय झाला.

 Court claims only | न्यायालयीन दाव्यांवरच खल

न्यायालयीन दाव्यांवरच खल

googlenewsNext

नाशिक : कोणत्या न्यायालयात किती खटले प्रलंबित आहेत? त्यांची सध्याची स्थिती काय आहे? त्यांच्याबाबत काही समेटाचे प्रयत्न सुरू आहेत का? खटल्यांचे कामकाज कोण पाहत आहे? त्यांचे शुल्क किती? त्याबाबतच्या समितीची बैठक होते का? विद्यमान कार्यकारिणीतीलच काही सदस्य त्यात सहभागी असताना खटल्यांमध्ये तडजोड का केली जात नाही? यासारख्या केवळ न्यायालयीन लढाईच्या मुद्द्यांवरच सावानाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निम्म्याहून अधिक वेळेचा कालापव्यय झाला. त्यामुळे तीन तास लांबलेल्या सभेतून अनेक सदस्य अर्ध्यातूनच निघून गेल्यानंतर अखेरीस सकारात्मक मुद्द्यांवर चर्चा होऊन विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.
सार्वजनिक वाचनालयाच्या १७९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रविवारी या मुद्द्यांवरील प्रश्न व त्यांची उत्तरे आणि मग पुन्हा त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांवरील उत्तरे असाच कलगीतुरा रंगला होता. श्रीकृष्ण शिरोडे, पद्माकर पाटील, राजे, रमेश कडलग, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, पां. भा. करंजकर, हंसराज वडघुले, सचिन डोंगरे आणि काही अन्य सभासदांनी उपस्थित केलेल्या याबाबतच्या मुद्द्यांना अ‍ॅड. अभिजित बगदे आणि अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी उत्तरे दिली. दरम्यान २०१२ ते२०१७ च्या संचालक मंडळाविरुद्ध दाखल केलेल्या दाव्यांमध्ये सुमारे ५० लाखांचे संस्थेचे नुकसान झाले असून, त्यातील सहा संचालक सध्याच्या समितीत असल्याचे श्रीकांत बेणी यांनी सांगितले. मी केलेला दावा हा कलम ४१ ड अंतर्गत असून, संबंधित १८ जणांनी मिळून ती रक्कम भरली तर मी माझा दावा मागे घ्यायला तयार असल्याचेदेखील नमूद केले.
कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी डॉ. नेर्लीकर दाम्पत्याकडून अजून ११ लाखांची देणगी जाहीर करण्यात आली असून, लवकरच ती मिळणार असल्याचे सांगितले. तसेच पांडू लीपी आणि पोथ्यांच्या डिजिटलायझेशनच्या ३० लाख रुपयांच्या कामासाठी जिल्हा प्रशासनाकडून सहकार्य मिळविल्याचे सांगितले. त्याशिवाय सावानाच्या संदर्भ विभागाचेदेखील डिजिटलायजेशन करण्यात येणार असून, त्यासाठीदेखील संस्थेच्या निधीला हात लावला जाणार नसल्याचे जातेगावकर यांनी नमूद केले. तसेच देवदत्त जोशी यांच्या संकल्पनेतून सांगलीच्या पूरग्रस्त वाचनालयासाठी प्रथम सर्व कार्यकारिणीची देणगी तसेच त्यानंतर बाबाज थिएटर आणि क्रेडाईच्या माध्यमातून झालेल्या संगीत कार्यक्रमाद्वारे २ लाख १८ हजार रुपयांची मदत सावानातर्फे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच लायब्ररी आॅन व्हिल्सचे काम पूर्ण झाले असून पुढील महिन्यात ती पूर्ण महानगरात फिरून नागरिकांना सेवा देणार असल्याचे सांगितले. सुहासिनी बुरकुले यांनी अनुवादित साहित्यासाठी सावानात काही वेगळे प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
लक्ष्मीकांत कोतकर यांनी सभासदांकडून सावाना तसेच प. सा. या दोन्ही ठिकाणांवर वाहनांच्या पार्किंगसाठी शुल्क आकारले जाऊ नये, अशी सूचना केली. प्रा. वेदश्री थिगळे यांनी अहवालवाचन करून सभासदांची मंजुरी घेतली. अर्थसचिव शंकर बर्वे यांनी अंतर्गत तपासनीस आणि सनदी लेखापाल निवडीबाबत सभागृहाची मंजुरी घेतली. सुरेश गायधनी, सुहास शुक्ल, हेमंत राऊत, श्रीकांत कापसे यांनीदेखील चर्चेत सहभाग नोंदवला. काही अन्य प्रश्नांना प्रमुख सचिव धर्माजी बोडके यांनी उत्तरे दिली.
उदयकुमार मुंगी यांनी गत वर्षभरात मयत झालेल्या सभासदांना आणि मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण केली. देवदत्त जोशी यांनी इतिवृत्त वाचन केले. यावेळी उपाध्यक्ष किशोर पाठक, नानासाहेब बोरस्ते, गिरीश नातू, वसंत खैरनार, शंकर बोºहाडे, संगीता बाफना, अ‍ॅड. भानुदास शौचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मुंढे यांना निधीचा विसर
सावानात विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पुरस्कारार्थी धनंजय मुंढे यांनी त्यांना दिलेल्या ५० हजार पुरस्काराच्या रकमेत एक हजारांची भर घालून ५१ हजार देण्याचे जाहीर केले होते. मात्र ती रक्कम अद्याप मिळाली नसल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडेदेखील थकबाकी असल्याचे सांगितले.
मुकुंद बेणी यांचे आंदोलन
यापूर्वीच्या सभांमध्ये येऊन विविध मागण्या आणि आरोपांचे फलक झळकवणाऱ्या मुकुंद बेणी यांना रविवारच्या सभेला प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे त्यांनी सभेच्या प्रवेशद्वारावरच फलक झळकवत आंदोलन केले.
बाल विभाग मोफत
वाचन संस्कृती जोपासण्यासाठी बालभवनचे प्रमुख संजय करंजकर यांनी यापुढे बालविभागातील वाचकांना कोणतेही शुल्क न आकारता मोफत पुस्तके पुरवण्याच्या निर्णयाला सभासदांकडून त्याला टाळ्यांच्या गजरात मंजुरी देण्यात आली. केवळ या मोफत पुस्तकांपोटी ३०० रुपयांचे डिपॉझिट एकदाच सावानाकडे ठेवावे लागणार असल्याचे करंजकर यांनी सांगितले.
औरंगाबादकर यांच्या नावे पुरस्कार
४ग्रंथभूषण मु. शं. औरंगाबादकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सावानातर्फे सर्वोत्कृष्ट ग्रंथपाल हा राज्यस्तरीय पुरस्कार ११ मार्चला प्रदान करण्यात येणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. या पुरस्कारासाठीची पहिली रक्कम विद्यमान अध्यक्ष प्रा. औरंगाबादकर यांनी दिली असून, त्याव्यतिरिक्त त्यांनी संस्थेला दोन लाख रुपयांची देणगीदेखील दिली असल्याचे कार्याध्यक्षांनी सांगितले.

Web Title:  Court claims only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.