विशेष म्हणजे महापालिकेत एवढा मोठा गोंधळ सुरू असताना या वादग्रस्त विषयावर अधिकारी आणि पदाधिकारी गप्प का बसलेत, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. त्यामुळे त्यांचे स्वपक्षीयही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
महापालिकेच्या पंचवार्षिक कारकिर्दीचे हे शेवटचे वर्ष असून, त्यामुळे अनेक प्रकार सध्या वादात सापडले आहेत. त्यात दिनकर पाटील यांनी आयुक्तांना पत्र देतानाच या विषयावर प्रशासनाकडून सुरू असलेल्या अनियंत्रित कामांबाबत आयुक्तांनाच जाब विचारला आहे. मायको सर्कल आणि त्रिमूर्ती चौकात उड्डाणपुलांचे काम सुरू होण्याआधीच ४४ कोटी रुपयांचा खर्च कसा काय वाढला, घंटागाडीचा ठेका तीन वर्षांत १७६ कोटी रुपयांवरून ३५४ कोटी रुपयांवर कसा काय पोहोचला, असा प्रश्न करताना पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यासाठीसुद्धा महापालिका चुकीच्या पद्धतीने कोट्यवधी रुपये मोजत आहे, असा आरोप केला आहे. बीओटीच्या नावाखाली ११ भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्यासही त्यांनी विरोध केला आहे.
महापालिकेतील अधिकारी व पदाधिकारी जनतेच्या पैशांची लूट सुरू असताना मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यामुळे महापालिकेतील भ्रष्ट कारभार थांबला नाही तर थेट जनआंदोलन उभे करण्याचा इशारा पाटील यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात दिला आहे.
इन्फो...
महापालिकेतील बहुतांशी भाजप नगरसेवक अस्वस्थ
ठेकेदारीबाबत सध्या महापालिकेत सुरू असलेल्या घाईगर्दी आणि कोटीच्या कोटी उड्डाणांमुळे भाजप नगरसेवक देखील अस्वस्थ आहेत. त्यात पक्षाची भीडभाड न ठेवणाऱ्या दिनकर पाटील यांनी पक्षाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.