क्रेडिट कार्डवरून जेष्ठ नागरिकाला नाशिकमध्ये दोन लाख ३९ हजार रुपयांना लावला चूना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 01:42 PM2018-01-11T13:42:13+5:302018-01-11T13:46:45+5:30
एकूणच सायबर गुन्ह्यांचे वेगवेगळे प्रकार दररोज समोर येत असल्याने संताप व्यक्त होत आहे. आधुनिकतेच्या युगात या गुन्ह्यांची संख्या वाढत असून शहरात आयुक्तालयामध्ये स्वतंत्ररित्या सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात आले आहे.
नाशिक : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण शहरात दिवसेंदिवस वाढत असून आॅनलाइनद्वारे फसवणूकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. एका भामट्याने क्रेडिट कार्डवरून ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून सुमारे दोन लाख ३९ हजार २५० रुपयांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, चांडकसर्कलवरील उष:काल सोसायटीमधील रहिवासी सुभाष बाबुराव व्यवहारे (६६) यांची अज्ञात भामट्याने लाखो रुपयांची फसवणूक केली. व्यवहारे यांच्या क्रेडीटकार्डशी संलग्न मोबाईलवर भामट्याने ई-मेल करुन त्यांच्या क्रेडिटकार्डवरून सुमारे २ लाख ३९ हजार २५० रुपये परस्पर लंपास केले आहे. याबाबत नाशिक सायबर पोलीस ठाण्यात व्यवहारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक राजेंद्र कुटे हे याबाबत अधिक तपास करत आहे. व्यवहारे यांना आलेला मेल, मोबाईल आदिंची पडताळणी करत तांत्रिकदृष्ट्या तपास केला जात असल्याचे सुत्रांनी सांगितले. अज्ञात भामट्यापर्यंत कसे पोहचणे शक्य होईल, यासाठी सायबर टीम प्रयत्न करत आहे.
एकूणच सायबर गुन्ह्यांचे वेगवेगळे प्रकार दररोज समोर येत असल्याने संताप व्यक्त होत आहे. आधुनिकतेच्या युगात या गुन्ह्यांची संख्या वाढत असून शहरात आयुक्तालयामध्ये स्वतंत्ररित्या सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात आले आहे. यावरुन सायबर गुन्ह्यांची समस्या गंभीर होत चालल्याने दिसून येते. नागरिकांनी सतर्कत बाळगून सावधगिरीने आॅनलाईन व्यवहार करण्याची गरज असल्याचे पोलीस प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात आहे. एटीएम, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बॅँकेचा खाते क्रमांकाची कोणी अज्ञात व्यक्ती काहीही प्रलोभने किंवा भीती दाखवून माहिती घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीला माहिती देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.