सिन्नर नागरी पतसंस्थेच्या संचालकांविरोधात गुन्हे
By admin | Published: March 11, 2017 01:18 AM2017-03-11T01:18:33+5:302017-03-11T01:18:45+5:30
सिन्नर : धनवर्धिनी ठेव खात्यातील रक्कम मुदत संपूनही परत न केल्याने सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह संचालक मंडळाविरोधात अपहार व फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिन्नर : धनवर्धिनी ठेव खात्यातील रक्कम मुदत संपूनही परत न केल्याने सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह संचालक मंडळाविरोधात अपहार व फसवणूक केल्याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिन्नर न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेच्या धनवर्धिनी ठेव योजनेत महेश पतसंस्थेने पैशांची गुंतवणूक केली होती. मुदत संपल्यानंतर सिन्नर नागरी पतसंस्थेकडे पैशांची मागणी करण्यात आली होती. तथापि, सिन्नर नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापक व संचालक मंडळाने रक्कम न देता पुन्हा नूतनीकरण करण्यास सांगितले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून या रकमेचे नूतनीकरण करण्यात आले होते. नूतनीकरणाची मुदत संपल्यानंतरही महेश पतसंस्थेस ठेवीची रक्कम परत करण्यात आली नाही. त्यामुळे सदर संस्थेने सिन्नर न्यायालयात धाव घेतली होती.
याप्रकरणी सिन्नर नागरी पतसंस्थेचे सूरजकुमार प्रकाश शहा, बाळासाहेब बळवंत पवार, राजेंद्र वसंत गोऱ्हे, चंद्रकांत बाबूलाल शहा, अशोक निवृत्ती कासार, जयंत किसन उगले, सतिष गंगाराम कोठावदे, माधव शंकर कापडी, संजित माणिकलाल शहा, सतिष चंपालाल खिंवसरा, सौ. रत्नप्रभा पांडुरंग वाजे, संपतलाल धनराज चोरडिया, बाळासाहेब लक्ष्मण पवार, राजाराम बबन घुगे, वामन बाबूराव जेजूरकर व आप्पासाहेब त्र्यंबकराज जंजिरे या संशयितांविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)