आक्रोश आंदोलन करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:11 AM2021-06-06T04:11:39+5:302021-06-06T04:11:39+5:30
नाशिक : जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधक कायदा तसेच मनाई आदेश लागू असताना जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलनासाठी परवानगी नाकारलेली असतानाही ...
नाशिक : जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधक कायदा तसेच मनाई आदेश लागू असताना जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलनासाठी परवानगी नाकारलेली असतानाही भाजपच्या ओबीसी मोर्चातर्फे शासनाविरोधात गुरुवारी (दि.३) आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी पदाधिकाऱ्यांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, महिला आघाडीच्या स्वाती भामरे, माधुरी पालवे, रोहिणी नायडू यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. ३) साथरोग प्रतिबंधक कायदा तसेच मनाई आदेश झुगारून आघाडी शासन न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत नसल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालय येथे आक्रोश आंदोलन केले. यासाठी भाजपच्या ओबीसी मोर्चातर्फे पोलिसांकडे मागितली होती; परंतु ही परवानगी नाकारण्यात आली असतानाही जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन केल्याने संबंधित पदाधिकार्यांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात साथरोग प्रतिबंधक कायद्यासोबतच पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.