नाशिक : सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिबेटियन मार्केट भागात चार वर्षांपुर्वी घडलेल्या एका खुनाच्या गुन्ह्यातील फरार संशयिताला बेड्या ठोकण्यास गुन्हे शाखा युनीट-१ला यश आले आहे. चार वर्षानंतर या गुन्ह्यातील संशयित आरोपी अजय जगन्नाथ भिमटे उर्फ अजय बाळू जाधव उर्फ अज्या भैट्या यास पोलिसांनी सापळा रचून अटक केली. अज्या हा बनावट आधारकार्ड तयार करुन परिसरात वास्तव्य करत होता.
गुन्हे शाखेचे पोलीस नाइक प्रवीण वाघमारे यांना चार वर्षांपुर्वी चेतन पवारच्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित अज्या हा पंचवटी भागात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंद वाघ यांना याबाबात कळविले. वाघ यांनी तत्काळ पथक तयार करुन पंचवटी भागात रवाना केले. सहायक निरिक्षक महेश कुलकर्णी, रघुनाथ शेगर, नाजीम पठाण,येवाजी महाले, वाघमारे आदींच्या पथकाने सापळा रचला.
संशयास्पद हालचालीवरुन पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. अज्या हा अजय भिमटे या बनावट नावाने आधारकार्ड तयार करुन वास्तव्य करत होता, असे तपासात पुढे आले आहे. कोरोनानंतर लॉकडाऊन काळात हाताला काम नसल्याने अज्या हा पुन्हा नाशकात परतला होता. तो दरी गावातील त्याच्या मावशीच्या घरी राहत होता. खुनाच्या घटनेनंतर तो गोव्यामध्ये पळाला होता. तेथे त्याने आश्रय घेत पेंटर म्हणून व्यवसाय सुरु केला होता. त्याला पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.