चांदवड : गेल्या एक महिन्यापासून अडकून पडलेल्या पीक कर्जाच्या फायली अजूनही धूळ खात पडल्याचे विदारक चित्र राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये पाहायला मिळत आहे. चांदवड तालुक्यातील वडाळीभोई महाराष्ट्र बँकेची शाखा त्याचे बोलके उदाहरण आहे. लॉकडाऊन थोडाफार शिथिल झाल्यावर शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी लगबगीने आपली प्रकरणे बँकेकडे सुपूर्द केली. मात्र, बोटावर मोजण्याइतके शेतकरी वगळता अन्य बहुतांशी शेतकऱ्यांना अजूनही पीक कर्जाचा लाभ मिळत नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे याच वडाळीभोई शाखेत दर मंगळवारी येणारे कृषी अधिकारी त्यांच्यावर इतर अनेक गावांचा अतिरिक्त भार असल्याने आठवड्यातून एकदाही मोठ्या प्रयासाने शेतकऱ्यांना त्यांची भेट होते. त्यात एखाद्या मंगळवारी सदर कृषी अधिकारी आले नाहीत तर शेतकऱ्यांना पुन्हा पुढील आठ दिवसांची वाट पाहावी लागत आहे. आता तर मागील एक आठवड्यापासून बँकेचे शाखा व्यवस्थापकच रजेवर गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. जिल्हा बँक एकीकडे शेतकऱ्यांना कर्ज देत नाही, तर दुसरीकडे राष्ट्रीयीकृत बँका असा छळ करीत असल्याने दाद कुणाकडे मागवावी, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
पीक कर्जाच्या फायली बँकांमध्ये धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 4:11 AM