नाशिक : ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे एक हजार ३६ हेक्टर शेतीक्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, नाशिकसह दिंडोरी, निफाड, सटाणा, चांदवड या तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ओखी वादळामुळे काढणीला आलेल्या द्राक्षांचे अधिक नुकसान झाल्याचे अहवालातून समोर आले असून, संबंधित अहवाल कृषी विभागाकडे मूल्यमापनासाठी पाठविण्यात आला आहे.कोकण किनारपट्टीवर गेल्या आठवड्यात धडकलेल्या ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातही बेमोसमी पाऊस व ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे जिल्हा परिसरातील पिकांचे मोठे नुकसाने झाले आहे. ओखी वादळामुळे जिल्ह्णात सुमारे १२५.५ मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे शहर परिसरासह जिल्हाभरातील काढणीला आलेल्या द्राक्षांचे मणी तडकल्याने मोठे नुकसाने झाले आहे. गेल्या दोन महिन्यांत पिकांना हा तिसरा फटका बसला असून, यापूर्वी आॅक्टोबर महिन्यात अवकाळीने सुमारे नऊ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसाने झाले होते. आॅक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांवर करपा, डावणीसह वेगवगेळ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला होता, तर आता अनेक द्राक्षबागा काढणीला आलेल्या असताना ओखी वादळाच्या प्रभावामुळे झालेला पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे द्राक्षांचे मणी तडकल्याने निर्यातक्षम द्राक्षांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. अचानक बदललेल्या वातावरणाचा फटका द्राक्षांबरोबरच कांदा, मका, टमाटे आदी पिकांनाही बसला आहे. सध्या काढणीला असलेला कांदा पावसाने भिजल्याने खराब झाला आहे. शेतमालाचे घसरते भाव आणि त्यातच अवकाळी पावसाने हाताशी आलेला घासही हिरावला गेल्याने शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. मदत कधी मिळणार ओखी वादळामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून, या अहवालानुसार एक हजार ३६.२२ हेक्टर शेतीक्षेत्राचे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकºयांना मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे प्राथमिक अहवालावरून समोर आले आहे. दरम्यान, आॅक्टोबरमधील अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकºयांना अद्यापही कोणतीही मदत मिळालेली नाही. त्यामुळे ओखी वादळाच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असला, तरी शेतकºयांना प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, याविषयी साशंकताच व्यक्त केली जात आहे.