देशमाने : प्यायला पाणी नाही... जनावरांना चारा नाही... पेरलेली सोन्यासारखी पिके आता माना टाकायला लागली. मोठ्या अपेक्षेने साठविलेले कांदे सडले तर बाजारभावानेदेखील घोर निराशा केली.तब्बल महिन्यापासून परिसरात पावसाने पूर्णत: ओढ दिली आहे. खरिपातील सोयाबीन, मका, बाजरी आदी पिके करपू लागली आहेत. बहरलेली ही पिके आगामी आठ दिवसांत जमीनदोस्त होतील. पालखेड डाव्या कालच्याची खरीप आवर्तनाची आशादेखील धुसरच दिसत असल्याने पिण्याच्या पाण्यासह, जनावरांच्या चाऱ्याची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. दुधाच्या भाववाढीचे गाजर दाखवून पदरी काहीच पडले नाही; परंतु पशुधन वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. ३५ रुपये प्र्रतिटन भावाने ऊस घेऊन जनावरांसाठी चारा म्हणून घालत आहेत. एकूणच शेतकरीवर्गाचा चहुबाजूने कोंडमारा सुरू आहे.दरम्यान, आर्द्रा नक्षत्राच्या एका पावसावर पेरलेली खरीप पिके आता शेवटच्या घटका मोजत असून, विहिरी कोरड्याठाक पडल्याने वाडीवस्त्यावर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पालखेड डाव्या कालव्यातून गोई नदी, वितरिका क्र .२१, २५ व २८ पाणी सोडावे अशी मागणी सरपंच विमल शिंदे, उपसरपंच भारत बोरसे, सदस्य योगेश गांगुर्डे, बाळासाहेब पवार, भागवत राठोड, गणेश दुघड, भागवत काळे, प्रकाश निवृत्ती काळे, कैलास जगताप आदींनी केली आहे.फोटो - देशमाने परिसरात पावसाअभावी खुंटलेली पिकांची वाढ.
पिके करपू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 5:08 PM