एकलहरे परिसरात पिके करपू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:31 AM2019-05-27T00:31:02+5:302019-05-27T00:31:18+5:30
परिसरात गेल्या आठ दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला आहे. पारा ४१ अंशांवर गेल्याने शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यापारी सर्वच उन्हापासून बचाव करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. पिके करपू लागली असून, विद्युतपुरवठा बंद असल्याने पिकांना पाणी नाही.
एकलहरे : परिसरात गेल्या आठ दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला आहे. पारा ४१ अंशांवर गेल्याने शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यापारी सर्वच उन्हापासून बचाव करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. पिके करपू लागली असून, विद्युतपुरवठा बंद असल्याने पिकांना पाणी नाही.
शेतकरी शेतीची कामे सकाळी १० च्या आत व दुपारी चारनंतर करतात. ज्यांनी ठोक पद्धतीने कामे घेतली आहेत, असे शेतमजूर अंगात सनकोट, डोक्याला स्कार्फ बांधून शक्यतो सावलीचा आडोसा करून कामे करतात. व्यापारी आपली दुकाने दुपारी चारनंतर उघडतात. कडकडीत उन्हामुळे दुपारच्या वेळी सर्वत्र रस्त्यांवर शुकशुकाट दिसतो. एखादी आइस्क्र ीम किंवा कुल्फी विक्रे त्याची गाडी रस्त्यावर फिरताना दिसते. एकलहरे परिसरात सध्या उन्हाळ्यामुळे दुष्काळी परिस्थिती आहे. गेल्या दहा-बारा वर्षांत नव्हता एवढा कडक उन्हाळा यावर्षी आहे, असे वयस्कर मंडळी सांगतात. कडक उन्हाच्या काहिलीमुळे गुरे-ढोरे झाडांच्या सावलीत विसावलेली दिसतात. परिसरातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी, हिंगणवेढा, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, माडसांगवी, गंगावाडी, सिद्धार्थनगर, एकलहरेगाव या सर्व भागात भरदुपारी रस्त्यांवर शुकशुकाट दिसतो. परिसरात दारणा व गोदावरी नदीला पाणी सोडले असले, तरी नदीकाठच्या मोटारींचा विद्युतपुरवठा बंद केल्याने पिकांना पाणी देता येत नाही. काही ठिकाणी विहिरी व शेततळ्यांना पाणी आहे, परंतु विजेचा पुरवठा दिवसा न देता रात्रीच्या वेळी दिला जातो. एकलहरे परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी रात्री शेताला पाणी देण्यासाठी जायला घाबरतात. त्यामुळे असून अडचण, नसून खोळंबा अशी शेतकऱ्यांची स्थिती झाली आहे. विजेचा पुरवठा रात्री न देता दिवसा ठेवावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पाण्याअभावी टमाटे, भुईमूग, जनावरांसाठीचा चारा होरपळू लागला आहे. कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिक उपरणे, टोप्या, स्कार्फ, छत्री, सनकोट, गॉगल आदी साधनांचा वापर करताना आढळतात. हातगाड्यांवर थंड पाण्याच्या बाटल्या, उसाचा रस, फळांचा ज्यूस, थंडगार टरबुजाच्या फोडी, ताक, लस्सी, लिंबूपाणी आदींना मागणी वाढली आहे.
एकलहरे, सामनगाव, कोटमगाव, जाखोरी परिसरात उन्हाचा दाह वाढल्याने व विजेचा लपंडाव सुरू असल्याने ही संधी साधून चोरट्यांच्या अनेक ठिकाणी छोट्या-मोठ्या चोºया वाढल्या आहेत. गेल्याच आठवड्यात सामनगावात धाडसी घरफोडी करण्यात आली.
उन्हाळ्यामध्ये लहान मुलांना गोवर, कांजिण्या, डायरिया यांसारखे आजार बळावण्याची शक्यता जास्त असते. म्हणून पालकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. सध्या उन्हाचा कडाका तीव्र वाढल्याने तापमान ४१ अंशांवर गेले आहे. अशा वातावरणात सगळ्यांनीच काळजी घेणे अत्यावश्यक आहे. भर दुपारी उन्हात फिरणे टाळावे, डोक्यावर टोपी, रु माल, उपरणे बांधावे. उन्हात काम करताना किंवा बाहेर जाताना अनेकदा उष्माघाताचा त्रास होतो. मळमळ, चक्कर येणे, डोकेदुखी, ताप, धडधड होणे अशी प्राथमिक स्वरूपाची लक्षणे दिसू शकतात. अशावेळी घरात किंवा सावलीत बसावे. संजीवनी जलाचा पेय म्हणून वापर करावा.
- डॉ. महेंद्र गाडेकर, सामनगाव