नाशिक : जिल्ह्यातील विविध गणेश मंदिरांमध्ये मंगळवारी अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी सकाळी महापूजा, अभिषेक, सहस्त्रआवर्तन आदि कार्यक्रम घेण्यात आले.चांदवड : येथील वडबारे रोडवरील इच्छापूर्ती गणेश मंदिरात विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष काका कोतवाल, बाबा पाटील, राजेंद्र शर्मा व सदस्यांच्या उपस्थित होते. मंत्रोच्चा व अभिषेक व महापूजा पुरोहित अमोल दीक्षित यांनी केली. मंदिर व्यवस्थापक काका जाधव त्यांच्या सहकार्यांनी भाविकांसाठी विविध सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षी अंगारक योग नसल्याने व या वर्षातील पहिला अंगारक योग आल्याने भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे दूरपर्यंत दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. चतुर्थीनिमित्त मंदिराच्या गाभाऱ्याला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. नवसाला पावणारा म्हणून या इच्छापूर्ती गणेशाची ख्याती आहे. यावेळी चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, उपनिरीक्षक कैलास चौधरी व पोलिीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वारे असल्याने शिवसेना व भाजपाच्या उमेदवारांचा प्रचाराचा नारळही मंदिरात वाढविण्यात आल्याने येथे भविकांची व कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. निफाड - नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथील श्री वरदविनायक गणपती मंदिरात अंगारक चतुर्थीनिमित्ताचा योग् साधत हजारो भक्तांनी बाप्पाचे दर्शन घेतले. नवीन वर्षातील हा पहिलाच अंगारक योग असल्याने येथील श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी जिल्ह्यातून अनेक भाविक येथे दाखल झाले होते. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. निफाड तालुक्यातील विविध भाविक विशेषत: महिला आणि मुली ३५ किमी पायी प्रवास करून श्रींच्या चरणी लीन झाले. अंगारक योग असल्याने भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन वरदविनायक देवस्थान ट्रस्टने सर्व भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी चोख व्यवस्था ठेवली होती. मंदिराच्या सभामंडपात अनेक भक्तांनी नवसपूर्तीसाठी सत्यनारायण पूजा मांडली होती. मंदिर परिसरात फुले, प्रसाद, खेळणी अशा विविध प्रकारची दुकाने थाटल्याने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते पहाटे गणेशास अभिषेक,दुपारी महाआरती असे अनेक धार्मिक विधी करण्यात आले मंदिराचे पुजारी जगदीश कुलकर्णी यांनी श्री गणेशाच्या स्वयंभू मूर्तीला जास्वंदीच्या फुलांनी सुबक आरास केली होती. सुरेशबाबा पाटील त्यांच्या सहकऱ्यांनी भाविकांसाठी मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची व बसल्यासाठी मांडवाची व्यवस्था केली होती. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असल्या तरी शिस्तीत भाविक दर्शन घेत असल्याने दर्शनाचे समाधान भाविकांच्या चेहऱ्यावर दिसत होते.लोहोणेर - ठेंगोडा येथील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. मंदिर परिसरात भाविकांसह लहान-मोठ्या दुकानांची दाटी झाल्याने यात्रेचे स्वरूप आले होते. मंगळवारी (दि.१४) ठेंगोडा येथील सिद्धिविनायक मंदिरात पहाटे ३ वाजेपासून भाविकांनी ा दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. पहाटे तीन वाजताच मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. देवळा सटाणा आदि लगतच्या परिसरातील महिला, भाविक पायी दर्शनासाठी आले होते. मंदिर परिसरात पेढे, फुले, नारळ आदि प्रसाद साहित्यांसह खेळणी, फराळाची लहान-मोठी दुकाने थाटण्यात आली होती .यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. नवसाला पावणाऱ्या स्वयंभू सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. कसमादे परिसरासह नाशिक, धुळे, जळगाव आदि परिसरातून गणेश भाविकांनी अंगारकी चतुर्थी या पर्वणीचा योग साधून सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. मंदिरासमोरील हमरस्त्यावर दुतर्फा लांबपर्यंत दुचाकी व चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वेळोवेळी वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. सटाणा पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (लोकमत ब्युरो)
गणपती मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी
By admin | Published: February 15, 2017 1:16 AM