येवल्यात लसीकरण केंद्रावर उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:15 AM2021-05-09T04:15:47+5:302021-05-09T04:15:47+5:30
लसीकरणासाठी जिल्हा स्तरावरून लस दिली जाते, ती शहरातील उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरित केली जाते. शहरातील उपजिल्हा ...
लसीकरणासाठी जिल्हा स्तरावरून लस दिली जाते, ती शहरातील उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरित केली जाते. शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने १८ ते ४४ वयोगटासाठी तसेच ४५ वर्षे पुढील वयोगटासाठीही लस उपलब्ध झाल्याने रुग्णालयाजवळच असणाऱ्या शहरातील स्वामी मुक्तानंद विद्यालयात शनिवारी, (दि. ८) लसीकरण सत्र घेण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने १८८ व्यक्तींना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस दिला गेला असून, यास दीड महिना उलटलेला असल्याने या व्यक्तींना दुसरा डोस देणे गरजेचे आहे. अशा व्यक्तींना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस व शिल्लक राहिल्यानंतर ४५ वर्षे पुढील उपस्थिताना पहिला डोस असे शंभर डोस देण्यात आले. तर १८ ते ४४ वर्षे गटातील नोंदणी केलेल्या उपस्थित ६८ जणांना कोविशिल्डचे लसीकरण करण्यात आले. ४५ वर्षे पुढील वयोगटास सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३००, पाटोदा, मुखेड, अंदरसुल, भारम येथे प्रत्येकी २०० डोसचे लसीकरण झाले.
इन्फो
वशिलेबाजीचा आरोप
स्वामी मुक्तानंद विद्यालय लसीकरण केंद्रावर नेहमीप्रमाणेच शनिवारी लसीकरणासाठी मोठी गर्दी उसळली होती. अनेक जण तर पहाटेपासून नंबर लावून थांबले होते. गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. त्यानंतर लसीकरण सुरळीत झाले. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील सावरगाव, अंदरसुल, नगरसुल येथील लसीकरणाबाबत तक्रारी झाल्या. लसीकरणात वशिलेबाजी होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.