निऱ्हाळे परिसरात मशागतीची कामे पूर्ण; पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 11:14 PM2021-06-15T23:14:33+5:302021-06-16T00:37:00+5:30
निऱ्हाळे : एकीकडे कोरोनाचे संकट असताना खरीप हंगाम हातचा जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी खरीपपूर्व शेती मशागतीची कामे पूर्ण केली. मृग नक्षत्रास प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहेत.
निऱ्हाळे : एकीकडे कोरोनाचे संकट असताना खरीप हंगाम हातचा जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी खरीपपूर्व शेती मशागतीची कामे पूर्ण केली. मृग नक्षत्रास प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने संचारबंदी केल्याने शेतकऱ्यांनी आपले लक्ष शेतीकडे केंद्रित केले होते. खरीप हंगामासाठी शेती मशागतीची कामे आटोपून घेतली आहेत. दरम्यान मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने शेतकरी आनंदी होऊन बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करण्यात गुंतले आहेत. दोन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पाठीमागे आर्थिक संकट उभे राहिले आहे. प्रथम दुष्काळ व नंतर मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस यामुळे खरीप व रबी असे दोन्ही हंगाम वाया गेले आहेत. तर यावर्षीही सुरुवातीलाच कोरोनाचे संकट सुरू असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. नुकतेच निर्बंध हटविल्याने ग्रामीण भागात शेतीची कामे चालू झाली आहेत.
रोहिणी नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून मृगाच्या पावसाची वाट पाहत शेतकऱ्यांची आभाळाकडे नजर लागली आहे. मशागतीचे काम उरकून घेतले आहे. मृगाच्या पावसाने हजेरी लावली की, पेरणीला सुरुवात होईल; परंतु मृग नक्षत्राला प्रारंभ होऊन आठ दिवस उलटले तरी अद्याप सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात पावसाचा थेंब नाही. तसेच कडक उन्हाळा सुरू झाला की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे. सध्यातरी शेतकऱ्यांची बियाणे व खते खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रावर गर्दी पाहायला मिळत आहे. अनेकांनी यंदा सोयाबीन पिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. कारण गोडतेलाचे वाढते भाव गगनाला भिडले असल्याने सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लॉकडाऊन काळात शेतकरी व शेतमजूर आर्थिक अडचणीत सापडला आहे. खरीप हंगामासाठी पेरणी कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने मदतीचा हात देण्याची मागणी परिसरातील शेतकरीवर्गाने केली आहे.