ग्रामीण भागात मशागतीची कामे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:47 AM2021-02-05T05:47:58+5:302021-02-05T05:47:58+5:30
--- खड्ड्यावर ढापे बसविण्याची मागणी मालेगाव : येथील महिला व बाल रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या गटारीवरील ढापे उखडले आहेत. या ...
---
खड्ड्यावर ढापे बसविण्याची मागणी
मालेगाव : येथील महिला व बाल रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या गटारीवरील ढापे उखडले आहेत. या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते. प्रवेशद्वारावरच ढापे उखडल्यामुळे वाहन धारकांना कसरत करीत वाहने हाकावी लागत आहेत. मनपाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. महापालिकेने या ठिकाणी ढापे बसवावेत, अशी मागणी केली जात आहे.
----
टेहरे चौफुलीवर पथदीप बंद
मालेगाव : शहरालगतच्या टेहरे चौफुलीवरील पथदीप गेल्या काही दिवसांपासून बंद पडले आहेत. या ठिकाणी अवजड वाहनांसाठी वळण्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते. शालेय विद्यार्थी या रस्त्याने ये-जा करीत असतात. या ठिकाणचे पथदीप गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. महापालिकेने पथदीप सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
----
सोमवार बाजारात अतिक्रमण
मालेगाव : कॅम्प भागातील सोमवार बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. वाहन धारकांना कसरत करीत वाहने हाकावी लागत आहेत. बाजार परिसरातील मुख्य रस्त्यांवर हातगाडी व इतर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. दुकानदारांनीही दुकानासमोर अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना अडचण होत आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या ठिकाणचे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी केली जात आहे.
----
चंदनपुरीला भाविकांची गर्दी
मालेगाव : तालुक्यातील श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाला काेरोनामुळे बंदी असली तरी भाविकांनी यात्रेच्या पहिल्याच दिवशी दर्शनासाठी गर्दी केली होती. ग्रामपंचायतीने कुठल्याही व्यावसायिकांना दुकाने थाटण्यास परवानगी दिली नसली तरी पूजा साहित्य व भंडाऱ्याची दुकाने लागली आहेत. श्री खंडोबा महाराजांच्या दर्शनाला राज्यासह मध्यप्रदेश व कर्नाटक येथून भाविक येत असतात. यात्रा रद्द झाल्याने लाखो रुपयांची उलाढाल थंडावली आहे.
----
भाषा संवर्धन पंधरवडा साजरा
मालेगाव : येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मराठी विभागाने निबंध लेखन, काव्य लेखन व हस्ताक्षर स्पर्धा घेतल्या. डॉ. विलास देवरे यांचे मराठी भाषा संवर्धन काळाची गरज या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. अरुण पाटील यांनी केले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. सी. एन. निकम हे उपस्थित होतेे.
----
रुग्णालय परिसरात स्वच्छतेची मागणी
मालेगाव : येथील सामान्य रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रुग्णालयाच्या पाठीमागील भागात गवत वाढले आहे. गटारींमध्ये पाणी साचले आहे. रुग्णालय प्रशासनाचे याकडे सर्रास दुर्लक्ष आहे. या रुग्णालयात कसमादे परिसरातील रुग्णांसह मालेगाव शहरातील रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. या परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
----